राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील खेड शिवापूर-नवीन कात्रज बोगदा-नवले पूल- वारजे या दरम्यान दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यांवर अनधिकृतपणे अतिक्रमण करण्यात आले आहे. तसेच सेवा वाहिन्या आहेत. ही अतिक्रमणे आणि सेवा वाहिन्या सात दिवसांच्या आत स्वखर्चाने काढून घेण्याचे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या वतीने (नॅशनल हायवेज ॲथॉरिटी ऑफ इंडिया – एनएचएआय) करण्यात आले आहे.
हेही वाचा >>>पुणे: मार्चपर्यंत १.८० लाख कृषिपंपांना नवीन वीजजोड देण्याचे उद्दिष्ट; महावितरणचे संचालक संजय ताकसांडे यांची माहिती
मिळकतधारकांनी अनधिकृतपणे केलेले अतिक्रमण व विनापरवाना बांधकाम मुदतीत काढून न घेतल्यास ती राष्ट्रीय राजमार्ग नियंत्रण (वाहतूक) अधिनियम दि कन्ट्रोल ऑफ नॅशनल हायवेज (लॅन्ड अँड ट्राफिक) ॲक्ट २००२ अन्वये जमीनदोस्त करण्यात येतील. तसेच अतिक्रमण कारवाईचा खर्च आणि दंड संबंधितांकडून वसूल करण्यात येणार आहे. एनएचएआयच्या वतीने ही अतिक्रमणे काढताना, सेवा रस्त्याची सुधारणा करताना काही नुकसान, असुविधा झाल्यास याला एनएचएआय जबाबदार राहणार नाही, असे एनएचएआय पुणेचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी स्पष्ट केले आहे.