मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपी असलेल्या लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांच्यावरील पुस्तक प्रकाशनाच्या पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमावरून वाद निर्माण झाला आहे. राज्याचे तीन माजी पोलीस महासंचालक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. मात्र या कार्यक्रमावर आक्षेप घेऊन कार्यक्रम रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
हेही वाचा >>> केंद्रीय प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; जेईई मेन्स जानेवारीत तर नीट ७ मे रोजी
‘लेफ्टनंट कर्नल पुरोहित द मॅन बिट्रेड?’ या स्मिता मिश्रा यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम स. प. महाविद्यालयातील लेडी रमाबाई सभागृहात १८ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला माजी पोलीस महासंचालक सत्यपाल सिंह, जयंत उमराणीकर, संजय बर्वे, मेजर गौरव आर्या आदी उपस्थित राहणार असल्याचे निमंत्रण पत्रिकेवर नमूद करण्यात आले आहे. मात्र भीम आर्मी बहुजन एकता मंचाचे अध्यक्ष दत्ता पोळ, मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार यांनी हा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी स. प. महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे निवेदनाद्वारे केली. मालेगाव बॉम्बस्फोटाचे प्रकरण एनआयए न्यायालयात प्रलंबित असताना पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम महाविद्यालयात करणे उचित नाही. शैक्षणिक उपक्रमांशी संबंध नसलेल्या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या परिसराचा वापर करू देऊ नये. व्यापक हितासाठी पुस्तक प्रकाशनाची मागणी त्वरित मागे घ्यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.