पुणे : कलाकार कोणत्याही क्षेत्रात गेला तरी त्याच्यातील वेगळेपण दिसते. सरकारने शाळांमध्ये किमान एक कला अनिवार्य केली पाहिजे. जेणेकरून शाळांमध्ये कलांना पूरक वातावरण निर्माण होईल, असे मत ज्येष्ठ अभिनेते मनोज बाजपेयी यांनी मांडले. सामाजिक आर्थिक विकास संस्था स्वप्नभूमीतर्फे आयोजित फिरोदिया करंडक विविध गुणदर्शन स्पर्धेच्या पारितोषिक वितरणावेळी बाजपेयी बोलत होते. ज्येष्ठ उद्योगपती अरूण फिरोदिया, जयश्री फिरोदिया, सूर्यकांत कुलकर्णी, अजिंक्य कुलकर्णी, दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी, गायिका सावनी रवींद्र, रिअर अॅडमिरल आशिष कुलकर्णी, एचसीएलचे विजय अय्यर, पीयूष वीनखेडे आदी या वेळी उपस्थित होते. दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी, गायिका सावनी रवींद्र, रिअर ॲडमिरल आशिष कुलकर्णी यांनी फिरोदिया करंडक स्पर्धेतील आठवणींना उजाळा दिला.
हेही वाचा >>> मी काही अमरपट्टा घेऊन आलो नाही: आमदार रविंद्र धंगेकर
बाजपेयी म्हणाले, मला नवव्या वर्षीच काय करायचं आहे हे माहीत होते. बिहारमधील छोट्या गावापासून, दिल्ली आणि मुंबईचा प्रवास केला. मी कॉलेजमधे असताना नाटकाच्या स्पर्धा नव्हत्या. त्यामुळे आजची पिढी भाग्यवान आहे. आजच्या मुलांमध्ये कला आहे, लोकांसमोर येण्याचा आणि कला सादरीकरणासाठीचा मंच आहे हा मोठा आशीर्वाद आहे. कलाकार कोणत्याही क्षेत्रात गेला तरी त्याच्यातील वेगळेपण दिसते. सरकारने शाळांमध्ये किमान एक कला अनिवार्य केली पाहिजे. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात एक फिरोदिया करंडक स्पर्धा होऊ शकेल. स्पर्धेने यंदा ४९ वर्षे पूर्ण केली. पुढील वर्ष सुवर्ण महोत्सवाचे आहे. हा मंच केवळ कलांच्या सादरीकरणाचा नाही, तर जीवनकौशल्यांचे शिक्षण या मंचावर मिळते, असे सूर्यकांत कुलकर्णी यांनी सांगितले.