पिंपरी : कलाकारांची मते विचारात घेऊन प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहाची निर्मिती केली. त्यामुळे नाट्यगृह आजही सुस्थितीत आहे. परंतु, प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात अनेक तांत्रिक त्रुटी आहेत. त्या दूर करण्याची मागणी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष, ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी केली. सायन्स पार्क येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, महापालिकेचे सेवानिवृत्त अतिरिक्त आयुक्त प्रवीण तुपे यावेळी उपस्थित होते.

नाट्य परिषदेचा अध्यक्ष झाल्यापासून बऱ्याच वेळेला मंत्रालयात जाणे होते. त्यामुळे नाही कसे म्हणायचे हे अधिकाऱ्यांकडून मला शिकता आल्याचे सांगत दामले म्हणाले, की चिंचवड येथील अत्याधुनिक प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह उत्तम स्थितीत दिसत आहे. नाट्यगृहात काय हवे, काय नको, हे कलाकारांना विचारून महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त तुपे यांनी दर्जेदार, टिकाऊ काम केले. नाट्यगृह गळत नाही. आसन व्यवस्था, ध्वनियंत्रणा व्यवस्थित आहे. मात्र, ग. दि. माडगूळकर हे नाट्यगृह बांधताना नाटकाच्या प्रयोगासाठी आवश्यक तांत्रिक बाबींचा विचार करण्यात आला नाही. त्यातील तांत्रिक त्रुटी दूर कराव्यात.

हेही वाचा – पिंपरी : मुळा नदीवरील बोपखेल पुलाचे काम चार वर्षांनी पूर्ण, आता लोकार्पणासाठी…!

हेही वाचा – पिंपरी : शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी विरोध करताच प्रशासनाचे एक पाऊल मागे; पूररेषेतील बांधकामांना अभय

‘सायन्स पार्क प्रकल्प देशभरात पोहोचावा’

महापालिकेने विज्ञानाचा प्रसार, प्रचार व्हावा यासाठी सायन्स पार्क तयार केले. परंतु, याची महाराष्ट्रात फारशी जाहिरात झाली नाही. लोकांनी यायला पाहिजे, बघायला पाहिजे. शासनाची मदत न घेता ही संस्था स्वत:च्या पायावर उभी आहे. हा प्रकल्प देशभरात पोहोचला पाहिजे. त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाहीही दामले यांनी दिली.