पुणे : ‘भूमिकेला मी कसा न्याय देऊ शकतो हाच कलाकाराचा ध्यास असतो. समाजामध्ये जाती, धर्म, पंथाच्या भिंती उंच होत असताना हसण्यामध्ये अजून जात-धर्म आलेला नाही हेच खरे,’ अशी मिश्कील टिप्पणी अभिनेते संदीप पाठक यांनी सोमवारी केली. ‘रामनगरी’ आणि ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या कलाकृती उद्याच्या कलाकारांसाठीही शिवधनुष्यच असतील, असे सांगून ‘चरित्रपटामध्ये मला पडद्यावर राजा गोसावी यांची व्यक्तिरेखा साकारायला आवडेल’, अशी इच्छा त्यांनी प्रदर्शित केली.
राम नगरकर कला अकादमी आणि बेलवलकर सांस्कृतिक मंचाच्या वतीने ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांच्या हस्ते संदीप पाठक यांना राम नगरकर कलागौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. या निमित्ताने निवेदक राजेश दामले यांनी संदीप पाठक यांची मुलाखत घेतली. त्या वेळी पाठक बोलत होते. ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या नाटकातील काही भागांचे सादरीकरण पाठक यांनी केले. राम नगरकर कला अकादमीच्या डाॅ. वैजयंती नगरकर, उदय नगरकर आणि बेलवलकर सांस्कृतिक मंचाचे समीर बेलवलकर या वेळी उपस्थित होते.
पाठक म्हणाले, ‘मराठवाड्यातील माजलगाव (जि. बीड) येथून छत्रपती संभाजीनगर येथील सरस्वती भुवन येथे नाट्य अभ्यासक्रम केला. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आळेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली घडलो. ‘नट दिसला पाहिजे’ ही आळेकर सरांची शिकवण अमलात आणून मुंबईला गेल्यानंतर नाटक, चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका क्षेत्रात मिळेल ते काम केले. व्यावसायिक नाटक करताना मी माझ्या आवडीच्या नाटकातही काम करायचो. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासमवेत ‘सर आली धावून’ हे पहिले नाटक मिळाले.’
‘मी मराठीमध्ये रमलो. माझ्यासाठी भूमिका असेल, तरच हिंदीमध्ये काम करेन. मराठी बोलणारा नट म्हणून मला हिंदी चित्रपटात जायचे नाही,’ अशी स्पष्ट भूमिका पाठक यांनी मांडली. ‘मुख्यमंत्री राहिलेला माणूस जसा दिल्लीत जात नाही. तसेच माझे आहे’ अशी पुस्तीही त्यांनी जोडली. ‘जगभरातील १९ देशांमध्ये ‘वऱ्हाड’चे प्रयोग झाले. तेथे फिरल्यानंतर त्या त्या देशांनी ऐतिहासिक वास्तूंचे कसे जतन केले आहे, याची जाणीव झाली. आपल्याकडे दाखविण्यासारखे खूप काही आहे, तर त्याचे दस्तावेजीकरण का करू नये, या जाणिवेतून यू-ट्यूब वाहिनीच्या माध्यमातून ‘जगात भारी पंढरीची वारी’ आणि ‘बाप्पासोबत गप्पा’ या मालिकांची निर्मिती झाली. गोदावरी मुंडे आणि मीरा उमाप यांच्याकडे असलेल्या लोकगीतांचे जतन केले’, असे त्यांनी सांगितले.
‘कोणत्याही पायाभूत सुविधा नसतानाही, विद्यापीठ स्तरावर उत्तमोत्तम कलाकार घडवण्याचे कार्य विद्यापीठांतील कलाविभाग करत आहेत. अशा परिस्थितीत किमान शासकीय विद्यापीठांमध्ये तरी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासनाने घ्यावी,’ अशी अपेक्षा व्यक्त करून आळेकर म्हणाले, ‘आपल्या व्यक्तिमत्त्वातील वैगुण्याला अस्त्र म्हणून कसे वापरायचे, त्याचेच भांडवल कसे करायचे, हे संदीपने दाखवून दिले आहे.’
सध्या विनोद हा गंभीर विषय झाला आहे. विनोद बोचू आणि टोचू लागला आहे. असे झाले, तर विनोदाने जायचे कुठे? यापुढे विनोदाला सेन्साॅर बोर्डाचे प्रमाणपत्र घ्यावे लागेल की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सतीश आळेकर, ज्येष्ठ नाटककार