मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला कैदी अभिनेता संजय दत्त याला चौदा दिवसांची अभिवाचन रजा कारागृह प्रशासनाकडून मंजूर करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास संजय दत्त मुंबईला रवाना झाला.
येरवडा कारागृहात संजय दत्त सध्या शिक्षा भोगत आहे. त्याला न्यायालयाने पाच वर्षे शिक्षा सुनावली असून त्यापैकी त्याने अठरा महिन्यांची शिक्षा भोगली आहे. त्याच बरोबर तो मे २०१३ पासून सध्या येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे. शिक्षेचा विशिष्ट कालावधी त्याने पूर्ण केला असल्यामुळे त्याने अभिवाचन रजा मिळण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे अर्ज केला होता. त्यानुसार हा अर्ज स्थानिक पोलीस ठाण्याच्या अभिप्रायासाठी पाठविण्यात आला होता. या सर्व प्रक्रियेनंतर संजय दत्तला कारागृह विभागाचे उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे यांनी चौदा दिवसांची अभिवाचन रजा मंजूर केली. त्यानुसार मंगळवारी सकाळी येरवडा कारागृहातून दत्तला सुटी देण्यात आली.
याबाबत कारागृह विभागाचे उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे यांनी सांगितले की, संजय दत्त याने ऑगस्ट महिन्यात अभिवाचन रजेसाठी अर्ज केला होता. त्यानुसार वेगवेगळ्या विभागांचे अहवाल, स्थानिक पोलिसांच्या अहवालानंतर कारागृह प्रशासनाकडून चौदा दिवसांची अभिवाचन रजा मंजूर करण्यात आली आहे. या काळात तो इतर व्यक्तींप्रमाणे आयुष्य जगू शकतो. मात्र, त्याला स्थानिक पोलीस ठाण्याला हजेरी लावावी लागणार आहे. त्याचबरोबर तो परदेशात जाऊ शकणार नाही. त्याने या काळात एखाद्या कायद्याचे उल्लंघन केल्यास त्याची रजा रद्द केली जाते.

Story img Loader