Riverfront Development Project Pune : पुणे महानगरपालिका आणि पुणे चिंचवड महानगरपालिकेच्या ‘रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट’ (RFD) ला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसत आहे. या प्रकल्पाच्या विरोधात काढण्यात आलेल्या ‘चिपको नदी मोर्चा’साठी काल (९ फेब्रुवारी) बाणेर येथील कलमाडी शाळेत शेकडोंच्या संख्येने नागरिक जमा झाले होते. यावेळी ‘ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार रिव्हर इज आवर सुपरस्टार’ अशा प्रकारची जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच नागरिकांनी घोषणा, गाणी याबरोबरच फलक आणि चेहर्यावरील रंग रंगोटीच्या माध्यमातून आरएफडी प्रकल्पाला अनेकांचा पाठिंबा नसल्याचा संदेश देण्यात आला.
या मोर्चाचा समारोप राम-मुळा संगमावर झाला. या मोर्चामध्ये प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी देखील सहभाग घेतला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “नदी आणि झाडांसाठी इतके लोक बोलत आहेत हे पाहून आम्हाला खूप प्रोत्साहन देणारे आहे. भावी पिढ्यांसाठी नदी वाचवणे आवश्यक आहे.”
सोनम वांगचुक यांचीही उपस्थिती
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, लडाख येथील पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक हे देखील पुण्यातील या मोर्चामध्ये सहभागी झाले. “मी येथे पुण्यातील लोकांचे आभार व्यक्त करण्यासाठी आलो आहे. त्यांना नद्या आणि झाडांची काळजी आहे. मी लडाखसाठी आंदोलन करताना देखील त्यांनी माझ्यासाठी आवाज उचावला होता. मी येथे त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांच्या नदी वाचवण्याच्या प्रयत्नामधून प्रेरणा घेण्यासाठी आलो आहे.” असे वांगचुक म्हणाले.
मोर्चाच्या शेवटी गर्दीला संबोधित करताना वांगचुक म्हणाले की, भारत एक लोकशाही देश असल्याने, लोकांनी आज मोर्च्याच्या माध्यमातून त्यांच्या पायांनी मतदान केले आहे. “तुम्ही स्वच्छ हवा, नदी आणि झाडांसाठी मतदान केले आहे,” असेही वांगचुक म्हणाले.
नदीपात्रात गोळा झालेल्या आंदोलनकर्त्यांनी पीसीएमसीच्या बाजूला सुरू असलेले काम पाहिले. यावेळी कार्यकर्त्यांनी पीसीएमसीच्या योजना काय आहेत ते नागरिकांना समजावून सांगितले. लोकांनी यावेळी कापण्यासाठी खुणा करून ठेवलेल्या झाडांना मिठ्या देखील मारल्या. यावेळी स्वयंसेवकांनी पोस्टकार्ड्स वाटली ज्यावर लोकांनी पंतप्रधानांसाठी संदेश देखील लिहिले. बाणेरमध्ये राहणाऱ्या भारती फर्नांडिस यांनी त्यांच्या पोस्टकार्डवर लिहिले की, “कृपया पुण्यातील नद्या वाचवा ही कळकळीची विनंती आहे”.
यावेळी विद्यार्थ्यांनी पंतप्रधान मोदी यांनी लांबलचक पत्र लिहिले, ज्यामध्ये त्यांनी झाडे तोडली आणि नद्या आकुंचन पावल्या तर भविष्यातील पिढ्यांचे काय होणार यावर विचार करावा अशी विनंती केली. पाच वर्षांच्या मुलीला खांद्यावर घेऊन नितीन विवरेकर हे देखील झाडे आणि नदी वाचवणे किती महत्त्वाचे आहे याची जाणीव करून देण्यासाठी मोर्चा मध्ये सहभागी झाले होते.