पुणे : ‘धक धक गर्ल’ अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित हिचे दर्शन रविवारी ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’मध्ये (पिफ) घडले. एरवी पडद्यावर पाहणाऱ्या चित्रपटप्रेमींना माधुरीला प्रत्यक्ष पाहण्याची संधी लाभली आणि नकळतपणे अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये माधुरीची छबी टिपली.
हेही वाचा – पुणे : नवजात मुलीचे अपहरण झाल्याचा आईचा बनाव, कालव्यात फेकून दिल्याचे पोलीस तपासात उघड
माधुरी दीक्षित हिने पती डॉ. श्रीराम नेने यांच्यासह पुणे आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला भेट दिली. माधुरी दीक्षित हिच्या ‘आरएनएम मुव्हींग पिक्चर्स’ची निर्मिती असलेला ‘पंचक’ हा मराठी चित्रपट महोत्सवातील मराठी चित्रपट स्पर्धात्मक विभागात दुपारी दाखविण्यात आला. या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान माधुरीने आपल्या चित्रपटाच्या कलाकारांसह भेट दिली. या चित्रपटाचे सहनिर्माते डॉ. श्रीराम नेने या वेळी उपस्थित होते. माधुरी आणि डॉ. नेने यांनी प्रेक्षकांसमवेत चित्रपट पाहण्याचा आनंद लुटला. महोत्सवाचे संचालक डाॅ. जब्बार पटेल आणि ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांनी त्यांचे स्वागत केले.