जाहिरात एजन्सींना आपल्या ग्राहकांना सेवा देण्यासाठी उत्तम डिझाईन्स द्यावी लागतात. यासाठी एजन्सीजना आर्टिस्ट आणि विविध अत्याधुनिक सॉफ्टवेअर खरेदी करण्यासाठी मोठा खर्च व गुंतवणूक करावी लागते. या सर्व गोष्टी लक्षात घेता सर्व जाहिरात एजन्सीजनी ग्राहकांना मोफत डिझायनिंग न देता त्याचे किमान शुल्क आकारावे, अशी अपेक्षा रिजनल अॅडव्हर्टायझिंग मार्केटिंग असोसिएशन (रामा) या संघटनेच्या सदस्यांनी व्यक्त केली.
जाहिरातीच्या व्यवसायात मोफत डिझायनिंग आणि डिस्काऊंट देण्याची प्रथा वाढत असल्याने व्यवसायाचे नुकसान होत आहे. याचा विचार करत रामाचे सदस्य आणि विविध जाहिरात संस्था यांच्यात नुकत्याच झालेल्या बैठकीत निश्चित केलेले दरपत्रक अध्यक्ष विनीत कुबेर यांनी मान्यतेसाठी ठेवले आणि सर्वानुमते निश्चित झालेले दरपत्रक एकमताने मंजूर करण्यात आले. या दरपत्रकातील दर किमान असून कल्पकता, आकर्षकता यासाठी आवश्यक दर आकारणी करण्याचे स्वातंत्र्य एजन्सीजना देण्यात आले.