जम्मू आणि काश्मीरसारख्या अशांत प्रदेशातील महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास आणि तसेच मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गेल्या काही वर्षांमध्ये बेकरी व्यवसायाने मोठा हातभार लावला आहे. या महिलांना व्यवसाय कौशल्यांसह व्यक्तिमत्व विकासासाठी मार्गदर्शन करण्यासाठी पुण्यातील असीम फाउंडेशनने पुढाकार घेतला. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चर आणि गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.
हेही वाचा- पुणे : हिंदू जन आक्रोश मोर्चाचे रविवारी आयोजन
पूंछ, रियासी, कुपवाडा, राजौरी, अखनूर अशा जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती जिल्ह्यांमधील या उद्योजक महिला सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. असीम फाऊंडेशन या संस्थेने या महिलांना त्यांच्या गावांमध्ये भारतीय सैन्याच्या मदतीने बेकरी व्यवसाय चालू करून दिले आहेत. बुधवारी मराठा चेंबरचे संचालक प्रशांत गिरबने, पदाधिकारी अनुजा देशपांडे, विणू शिवदासानी तसेच गोखले संस्थेतील सत्रात सीड आणि दे आसरा फाऊंडेशनतर्फे रेवती पाटील यांनी मार्गदर्शन केले. लाम आणि कुपवाडा येथील महिलांनी दुर्गम भागात राहताना येणाऱ्या अडचणी, त्यावर जिद्दीने मात करत केलेली व्यवसाय उभारणी असा प्रवास उलगडला. वय वर्ष २० ते ६५ मधील महिलांनी पिझ्झा, ब्रेड, खारी अशा विविध उत्पादनांच्या निर्मितीविषयी यावेळी प्रशिक्षण घेतले.
असीम फाउंडेशनचे अध्यक्ष सारंग गोसावी म्हणाले, पहिल्याच दिवशी पुणे रेल्वे स्थानकावर हमाल आणि महिला रिक्षा चालकांच्या चमूने या गटाचे स्वागत केले. यानंतर अलिबाग आणि पेणमधील बेकरी आणि खाद्यपदार्थ व्यवसायांना भेट आणि पुण्यातील काही प्रशिक्षण सत्रे असे या दौऱ्याचे स्वरूप आहे. या महिलांनी बनवलेल्या पाककृतींचे प्रदर्शन आणि संवाद हा कार्यक्रम २१ जानेवारीला दुपारी साडेचार ते सात या वेळेत शहरातील गोवर्धन मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आल्याचे गोसावी यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा- श्रीगौड ब्राह्मण जातपंचायतीच्या मनमानीमुळे ४०० विवाह रखडले
संदीप तांबे म्हणाले, या महिलांना शहरातील महिलांचे आयुष्य, त्या करत असलेल्या विविध गोष्टी यांबाबतही माहिती मिळावी; तसेच त्या करत असलेला उद्योग व्यवसाय अधिकाधिक नाविन्यपूर्ण आणि अद्ययावत करण्यासाठी या दौऱ्याचा उपयोग होईल, अशी अपेक्षा आहे.