पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अतिरिक्त कार्यभाराने चालवल्या जाणाऱ्या पदांमध्ये आणखी एका पदाची भर पडली आहे. परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. महेश काकडे यांचा कार्यकाळ संपल्याने या पदाची जबाबदारी आता डॉ. प्रभाकर देसाई यांच्याकडे देण्यात आली आहे. राज्यपालांनी विद्यापीठांतील पदभरतीला दिलेली स्थगिती उठल्यानंतरच आता विद्यापीठातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विद्यापीठातील प्राध्यापकांच्या पदांसह महत्त्वाची पदे रिक्त आहेत. त्यात चार विद्याशाखांचे अधिष्ठाता, कुलसचिव यांचा समावेश आहे. या पदांचे कामकाज अतिरिक्त कार्यभाराने चालवण्यात येत आहे. डॉ. महेश काकडे यांचा परीक्षा संचालक पदाचा कार्यकाळ १० फेब्रुवारी रोजी संपुष्टात आला. राज्यपालांनी विद्यापीठांतील रिक्त पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यास स्थगिती दिली असल्याने या पदांसाठीची भरती प्रक्रिया ठप्प आहे. त्यात आता परीक्षा विभागाचेही पद रिक्त झाले आहे. परीक्षा विभाग संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार मराठी विभागातील प्राध्यापक डॉ. प्रभाकर देसाई यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार परीक्षा पद्धतींमध्ये सुधारणांचे काम सुरू करण्यात आले होते. हे काम या कार्यकाळात पूर्ण करण्यावर भर देण्यात येईल,’ असे डॉ. देसाई यांनी सांगितले. आता राज्यपालांनी पदभरतीला दिलेली स्थगिती कधी उठणार, विद्यापीठातील प्राध्यापक भरतीसह अन्य पदांची ठप्प असलेली प्रक्रिया कधी सुरू होणार, याकडे लक्ष लागले आहे.