बँका आणि व्यावसायिकांच्या धोरणामुळे नागरिकांची लूट

शासनाकडून डिजिटल इंडियाची घोषणा देत नागरिकांना रोकडरहित व्यवहारांसाठी प्रोत्साहित केले जात असताना दुसरीकडे डेबिट कार्डच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यवहारांवर अनेक व्यावसायिक अतिरिक्त शुल्क आकारत आहेत. अशा प्रकारचे कोणतेही शुल्क आकारणे बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट निर्देश रिझव्‍‌र्ह बँकेने दिले असतानाही बँका आणि व्यावसायिकांच्या धोरणामुळे नागरिकांकडून पैशाची लूट केली जात आहे. याबाबत कोणत्याही नागरिकाला थेट रिझव्‍‌र्ह बँकेकडे ई-मेलद्वारे तक्रार करणे शक्य आहे.

जास्तीत जास्त नागरिकांनी रोकडरहित व्यवहार करावेत, यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. एटीएमच्या माध्यामातूनही नागरिकांना रोख रक्कम कमी प्रमाणात मिळते आहे. त्यामुळे शक्य असेल त्या ठिकाणी डेबिट कार्डचा वापर केला जात आहे. मात्र, काही ठिकाणी डेबिट कार्डच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या खरेदीवर व्यावसायिकांकडमून दोन टक्के अतिरिक्त शुल्क वसूल केले जात आहे. याबाबतच्या विविध तक्रारी सध्या येत आहेत. अतिरिक्त शुल्काच्या मुद्दय़ावरून नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये वादावादीही होत आहे. अतिरिक्त शुल्काबाबत व्यावसायिकांकडे नागरिकांनी विचारणा केल्यास बँकांकडून हे शुल्क आकारले जात असल्याचे सांगण्यात येते. डेबिट कार्डच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांबाबत रिझव्‍‌र्ह बँकेने २०१३ मध्येच सूचना प्रसिद्ध केली आहे. डेबिट कार्डच्या व्यवहारावर अतिरिक्त शुल्क लावता येणार नाही. तसे करणे अयोग्य असून, कायद्यात बसणारे नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क लावता येणार नसल्याचे त्यात रिझव्‍‌र्ह बँकेने स्पष्ट केले आहे. याबाबत सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर म्हणाले, की रिझव्‍‌र्ह बँकेचे स्पष्ट आदेश असतानाही बँकांकडून अतिरिक्त शुल्काची अकारणी केली जाते. त्यामुळे व्यावसायिकही नागरिकांकडून शुल्क घेतात. याबाबतच्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे. कॅशलेस इंडियाचा नारा दिला जात असताना अशा प्रकारे नागरिकांना भरुदड बसणार असेल, तर लोक रोख व्यवहार करण्यासच पसंती देतील. अतिरिक्त शुल्क आकारणीबाबत जास्तीत जास्त नागरिकांनी रिझव्‍‌र्ह बँकेकडे तक्रार नोंदविली पाहिजे.

थेट रिझव्‍‌र्ह बँकेकडे तक्रार नोंदवा

डेबिट कार्डच्या व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क आकारल्याबाबत नागरिकांना थेट रिझव्‍‌र्ह बँकेकडे ई-मेलद्वारे तक्रार नोंदविता येते. gov@rbi.in या रिझव्‍‌र्ह बँकेच्या ई-मेलवर तक्रार स्वीकारली जाते. रिझव्‍‌र्ह बँकेच्या ग्राहक शिक्षण आणि संरक्षण विभागाकडेही याबाबत तक्रार दाखल करता येते.  cepdeo@rbi.org.in हा या विभागाचा ई-मेल आहे.

Story img Loader