पुणे : पावसाळा सुरू होण्यापूर्वी महापालिकेच्या सर्व विभागांमध्ये समन्वय राहावा, यासाठीचे नियोजन महापालिकेने सुरू केले आहे. शहरातील ९० किलोमीटर लांबीच्या नाल्यांची, १२५ पावसाळी वाहिन्यांची सफाई ७ जूनपूर्वी प्राधान्याने पूर्ण केली जाणार आहे. तसेच, समाविष्ट गावांमधील १२३ पाणी साचणारी ठिकाणे आणि नाल्यांवरील १८९ ठिकाणची अतिक्रमणेही संयुक्त कारवाईद्वारे काढून टाकण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी ही माहिती दिली. पावसाळापूर्व आवश्यक असलेली कामे पूर्ण करण्यासाठी त्यांनी मंगळवारी आपत्ती व्यवस्थापनाची आढावा बैठक घेतली. या बैठकीला महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन, सांडपाणी व्यवस्थापन विभागाचे मुख्य अभियंता जगदीश खानोरे, अधीक्षक अभियंता दिनकर गोजारे, यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), महामेट्रो, महावितरण, तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी महापालिकेतील प्रत्येक विभागाने आवश्यक असलेली सर्व कामे पूर्ण करावीत, अशा सूचना या बैठकीत विभागप्रमुखांना करण्यात आल्या. विभागाच्या वतीने सुरू असलेली कामे दिलेल्या वेळेत पूर्ण होत आहेत, की नाही, याचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. पावसाळ्यात कोणत्याही भागात पाणी तुंबण्याचे प्रकार घडू नयेत, यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांसाठी नालेसफाई व ड्रेनेज सफाईसाठी प्रत्येकी एकेक, अशा ३० निविदा काढण्यात आल्या आहेत. त्यानुसार ही कामे केली जातील.

समाविष्ट २३ गावांमध्ये पावसाळी वाहिन्या नसल्याने या गावांमधील नालेसफाईसाठी आठ निविदा काढण्यात आल्या आहेत. पावसाळ्यातील पूर्वानुभवानुसार ९० किलोमीटर लांबीचे नाले व १२५ पावसाळी वाहिन्या प्राधान्यक्रमाने स्वच्छ केल्या जाणार असल्याचे पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले. शहरातील पाणी साचणाऱ्या ११६ ठिकाणांची स्वच्छतादेखील महापालिकेच्या वतीने केली जाणार असून, सर्व क्षेत्रीय अधिकारी व परिमंडळ अधिकाऱ्यांनी या कामांवर नियमित लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

‘पीएमआरडीए’च्या समन्वयाने समाविष्ट २३ गावांमध्ये आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील. तसेच, येथील नाल्यांवरील १८९ ठिकाणच्या अतिक्रमणांवर पावसाळ्यापूर्वी संयुक्त कारवाई केली जाईल. पुढील तीन ते चार दिवसांत याची यादी ‘पीएमआरडीए’ला दिली जाईल. आवश्यक पूर्वतयारी झाल्यानंतर ही कारवाई केली जाणार आहे.- पृथ्वीराज बी. पी.,अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका