पुणे : महापालिकेच्या अतिरिक्तपदी नियुक्ती करण्यात आलेले एम. जे. प्रदीप चंद्रन यांच्याकडे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी अतिरिक्त आयुक्त (जनरल) पदाचा कार्यभार दिला आहे. त्यांच्याकडे १८ विभागांची जबाबदारी असणार आहे. यामध्ये मुख्य लेखा व वित्त विभाग, पाणीपुरवठा प्रकल्प, अतिक्रमण, शिक्षण, सामान्य प्रशासन या विभागांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे महापालिकेच्या दोन अतिरिक्त आयुक्तांची पदे गेले ११ महिन्यांपासून रिक्त होती. त्यातील एका पदावर राज्य सरकारने प्रदीप चंद्रन यांची नियुक्ती केल्याचा आदेश चार दिवसांपूर्वी काढला. सोमवारी महापालिका आयुक्त डॉ. भोसले यांनी चंद्रन यांच्याकडे अतिरिक्त आयुक्त (जनरल) या पदाची जबाबदारी दिली आहे. महापालिकेत येण्यापूर्वी चंद्रन हे मुंबईतील उद्योग संचालनालयाचे अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग) या पदावर कार्यरत होते. भंडारा जिल्हाधिकारी म्हणूनदेखील त्यांनी काम केलेले आहे. तसेच राज्य सरकारच्या विविध विभागांतील कामाचा त्यांना अनुभव आहे.

मागील वर्षी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार भारतीय प्रशासकीय सेवेतील तसेच पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. राज्य सरकारने याबाबतचे आदेश काढले होते. त्यावेळी पुणे महापालिकेच्या आयुक्तांसह दोन अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यापैकी आयुक्त म्हणून डॉ राजेंद्र भोसले यांची तर अतिरिक्त आयुक्त म्हणून पृथ्वीराज बी.पी यांची नियुक्ती राज्य सरकारने केली होती. मात्र दोन अतिरिक्त आयुक्तांच्या जागांवर कोणत्याही अधिकाऱ्याची बदली झाली नव्हती. विधानसभा निवडणुकी नंतरही या जागा रिक्त होत्या.

या रिक्त असलेल्या एका जागेवर शासनाने प्रदीप चंद्रन यांना संधी दिली आहे. पश्चिम महाराष्ट्रात झालेली ही त्यांची पहिलीच नियुक्ती आहे. महापालिका आयुक्तांनी त्यांना खात्यांची जबाबदारी दिली असून, त्यानुसार महापालिकेचे काम सध्या समजावून घेत असल्याचे प्रदीप चंद्रन यांनी सांगितले. त्यांच्याकडे महापालिकेच्या १८ विभागांची जबाबदारी देण्यात आली असून, यामध्ये लेखापरीक्षण, आरोग्य, शिक्षण विभाग, अग्निशामक दल, तांत्रिक विभाग, उपायुक्त विशेष यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

शिक्षण विभागाची आज आढावा बैठक महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (जनरल) पदाची जबाबदारी घेतल्यानंतर प्रदीप चंद्रन यांनी विविध विभागांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी (११ मार्चला) त्यांनी शिक्षण विभागाची बैठक बोलाविली आहे. यामुळे शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांची धावपळ सुरू होती. दोन आठवड्यांपूर्वी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी शिक्षण विभागाची बैठक घेत आढावा घेतला होता. नवीन रुजू झालेल्या अतिरिक्त आयुक्त चंद्रन यांनी पुन्हा बैठक घेण्याचे नियोजन केल्याने त्यात ते काय आढावा घेणार, याची उत्सुकता आहे.