संपूर्ण अधिकारांसह २० विभागांचा कार्यभार

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी : पिंपरी पालिकेतील अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्याकडे जवळपास २० विभागांचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. या विभागांचे संपूर्ण अधिकार आष्टीकरांना देण्यात आले आहेत. भाजप नेत्यांची कृपादृष्टी असल्यामुळेच अतिरिक्त आयुक्तपदाच्या प्रभारी कार्यभारासह एकेक करत अनेक महत्त्वाचे विभाग त्यांच्याकडे सोपवण्यात आले आहेत.

आष्टीकर हे प्रतिनियुक्तीवर पिंपरी पालिकेत आले आहेत. यापूर्वी त्यांच्याकडे सहायक आयुक्तपदाची जबाबदारी होती. राष्ट्रवादीची पालिकेत सत्ता असताना ते राष्ट्रवादी नेत्यांच्या जवळचे होते. सत्तांतरानंतर भाजप नेत्यांशी त्यांनी जवळीक साधली. भाजप नेत्यांच्या कृपादृष्टीमुळेच आष्टीकरांना अतिरिक्त आयुक्तपदाची प्रभारी जबाबदारी सोपवण्यात आली. नंतर, एकेक करत त्यांच्याकडे २० विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. स्थापत्य मुख्यालय, स्थापत्य (उद्यान), शिक्षण मंडळ (प्राथमिक), माध्यमिक शिक्षण विभाग, आयटीआय (मोरवाडी व कासारवाडी), निवडणूक, जनगणना, आधार, वैद्यकीय विभाग, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, पशुवैद्यकीय, विद्युत मुख्य कार्यालय, कार्यशाळा विभाग, दूरसंचार विभाग, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग, झोपडपट्टी (स्थापत्य), नागरवस्ती योजना विभाग, उद्यान व वृक्षसंवर्धन, नागरी सुविधा केंद्र हे विभाग आष्टीकर यांच्याकडे आहेत. याखेरीज, बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांच्याकडील आर्थिक अधिकार काढून ते आष्टीकरांना देण्याचा निर्णय भाजप नेत्यांनी घेतला. या सर्व विभागातील अंतिम निर्णय तेच घेणार आहेत. यापैकी कोणत्याही विभागाची फाइल आयुक्तांकडे जाणार नाही, त्यामुळे आष्टीकर सर्वात ताकदीचे अधिकारी बनले आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Additional commissioner of pcmc get 20 departments additional charge