लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : महापालिकेने मालमत्ता कर वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. प्रशासनाने आता थकबाकीदारांच्या पाच लाखाहून अधिक थकबाकी असणाऱ्या मालमत्ता लाखबंद (सील) करण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेमध्ये अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी चिखली, तळवडे, आकुर्डी, वाकड विभागातील मिश्र, बिगनिवासी, व्यावसायिक थकबाकीदारांच्या १४ मालमत्ता लाखबंद केल्या आहेत. निवासी मालमत्ता कर थकबाकीदारांच्या मालमत्तांचे नळजोड तोडणीची कारवाई करण्यात आली.
महापालिकेच्या कर संकलन व आकारणी विभागामार्फत मालमत्ता कर आकारणी करण्यात येते. मालमत्ता कर भरण्यासाठी नागरिकांना सातत्याने आवाहन करण्यात आहे. वारंवार आवाहन करून देखील जे मालमत्ताधारक मालमत्ता कर भरत नाहीत, त्यांना नोटीस देण्यात येत आहेत. त्यानंतरही कर न भरणाऱ्या थकबाकीदारांच्या आता थेट मालमत्ता लाखबंद करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी मालमत्ता कर विभागाची प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयात पथके कार्यरत करण्यात आली आहे. त्यातच आता आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे बारा दिवस शिल्लक राहिल्यामुळे आता थेट लाखबंदची कारवाई करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त जांभळे-पाटील, सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांच्यासह अधिकारी ऑन ग्राऊंड दिसू लागले आहेत.
चिखली येथील संदीप मोरे यांच्या मिश्र मालमत्तेकडे २३ लाख ४९ हजार ५०८ रुपयांची थकबाकी असल्याने मालमत्ता लाखबंदची व नळजोड तोडणीची कारवाई करण्यात आली. तळवडे येथील नवनाथ भालेकर,इतर यांच्या इंडिया टूल्स या औद्योगिक मालमत्तेकडील २० लाख ६४ हजार रुपयांच्या थकीत रकमेपोटी मालमत्तेवर कारवाई करण्यात आली.
याचबरोबर, माधव बेळळे यांच्या मिश्र मालमत्तेकडील १६ लाख ९३ हजार ५९७ इतक्या रक्कमपोटी, आकुर्डीतील विवेक काळभोर, गोपाळ काळभोर व इतर दोन यांच्याकडील २८ लाख ३७ हजार २०३ इतक्या थकीत रकमेपोटी, अनिकेत काळभोर यांच्या २३ लाख ३८ हजार ५२२, ओंकार काळभोर यांच्या दहा लाख ७५ हजार ४०४, अजिंक्य काळभोर यांच्या एक लाख ८९ हजार ८४६ इतक्या थकीत रकमेपोटी तर वाकड येथील धनाजी विनोदे यांच्याकडील १४ लाख ४४ हजार ९०२ रुपये इतक्या थकीत रकमेपोटी मालमत्ता लाखबंदीची कारवाई करण्यात आल्या.
अतिरिक्त आयुक्तांच्या उपस्थितीत होणार कारवाई
आर्थिक वर्ष संपायला अवघे १२ दिवस बाकी असल्याने आता पाच लाखाहून अधिक थकबाकी असणाऱ्या थकबाकीदारांच्या रोज दहा मालमत्तावर कारवाई केली जाणार असल्याचे कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले आहे.
आतापर्यंत ८६२ कोटींची वसुली
महापालिकेने आतापर्यंत ८६२ कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे बारा दिवस शिल्लक राहिले असून त्या अनुषंगाने कर वसुलीची मोहीम अधिकच व्यापक स्वरुपात राबवली जात आहे. तसेच नागरिकांच्या सोयीसाठी साप्ताहिक सुट्टी (शनिवार, रविवार) आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही कर संकलन कार्यालय सुरू राहणार आहे.