पिंपरी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रकाश कदम यांच्या बदलीवर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले असून आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी त्यांना मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, पुढील व्यवस्था होईपर्यंत कदम यांनी या पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारावा, अशी विनंतीही केली आहे. त्याचप्रमाणे, सहआयुक्तपदावर सहायक आयुक्त पांडुरंग झुरे यांना रुजू होण्याचे आदेश दिले आहेत.
प्रकाश कदम यांची पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात पुरवठा विभागात बदली झाली आहे. महिनाभरापूर्वी बदली होऊनही आयुक्तांनी त्यांना सोडले नव्हते. कदम यांना विभागीय आयुक्त कार्यालयात दुष्काळाशी संबंधित कामे सोपवली आहेत. त्यामुळे त्यांना तातडीने रूजू होण्याचे आदेश विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी दिले. त्यानुसार, आयुक्तांनी शनिवारी कदम यांना  मुक्त केले. मात्र, काही दिवस याच पदाचा कार्यभार सांभाळण्यास सांगितले आहे.
दरम्यान, सहआयुक्त पदावरून अमृतराव सावंत निवृत्त झाले. त्यांच्या जागी झुरे यांची नियुक्ती करून आयुक्तांनी स्थानिक पालिका अधिकाऱ्यांना न्याय दिला आहे. झुरे हे पालिकेतील सर्वात ज्येष्ठ अधिकारी आहेत. सध्या ते ड प्रभागात असून सहआयुक्त पद देण्यात आल्याने त्यांना मुख्यालयात आणले जाईल, असे संकेत आहेत.