पुणे : मागील वर्षभरात ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक पदाची ‘संगीत खुर्ची’ सुरू आहे. कोणताही अधिकारी या पदावर जास्त काळ राहत नसल्याचे चित्र आहे. आता नवीन अधीक्षक नेमण्यात आले असून, तेही नाराज असल्याचे समोर आले आहे. कारण अधीक्षकांवर अतिरिक्त तीन जबाबदाऱ्या टाकण्यात आल्या असून, त्यातून मुक्त करण्याची मागणी नवीन अधीक्षकांनी अधिष्ठात्यांकडे केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ससून रुग्णालय हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठे सरकारी रुग्णालय आहे. या रुग्णालयात दररोज हजारो नागरिक येतात. आजारपणाव्यतिरिक्त इतर सरकारी प्रमाणपत्रांसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठी असते. यात अपंगात्वाची प्रमाणपत्रे, वैद्यकीय प्रतिपूर्ती यासह इतर महत्त्वाची कामे असतात. मागील वर्षभरात पाच अधीक्षक रुग्णालयाने पाहिले आहेत. मे महिन्यात डॉ. यल्लपा जाधव यांची अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर तीनच महिन्यांत त्यांना हटवून आता डॉ. सुनील भामरे यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली.

आणखी वाचा-सावधान! राज्यात डोळ्यांच्या साथीचे पुण्यात सर्वाधिक रुग्ण

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. भामरे यांनी ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर ते आजारपणाच्या रजेवर गेले. त्यांच्यावर वैद्यकीय अधीक्षक पदासोबत बीजे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासकीय अधिकारी, राष्ट्रीय वैद्यकीय परिषद आणि बायोमेट्रिक या विभागांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांनी आता अतिरिक्त जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्याकडे केली आहे. अधीक्षकपदी काम करण्यासाठी पूर्णवेळ देता यावा आणि चांगल्या पद्धतीने काम करता यावे, यासाठी त्यांनी अधिष्ठात्यांना पत्रही लिहिले आहे.

आणखी वाचा-पुणे : दुभाजकाला धडकून कंटेनरचा भीषण अपघात

ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकाने संपूर्ण रुग्णालयाची जबाबदारी घेणे अपेक्षित असते. आधीच्या अधीक्षकांनी चांगले काम केले नाही, म्हणून त्यांना पदावरून हटविले होते. अधीक्षकांवरील कामाचा बोजा कमी करण्यासाठी एकाऐवजी दोन उपअधीक्षक नेमण्याचा प्रस्ताव आहे. -डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, ससून रुग्णालय

ससून रुग्णालयातील आधीच्या अधीक्षकांना त्यांच्या विरोधात तक्रारी असल्याने पदावरून हटविण्यात आले. आता तिथे नवीन अधीक्षक नेमण्यात आले असून, ते कार्यक्षम आहेत. रुग्णांच्या सोईसाठी आणि प्रशासकीय कामकाज व्यवस्थित चालण्यासाठी त्यांची नियुक्ती दीर्घकाळ असेल याची काळजी घेण्यात येईल. -डॉ. अजय चंदनवाले, संचालक, वैद्यकीय शिक्षण विभाग

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Additional responsibilities on sassoon hospital superintendent pune print news stj 05 mrj