पुणे : कारागृहातील बंदीजनांमध्ये अनेक सुप्त कलागुण असतात. बंद्यांना त्यांचे कलागुण, छंद कारागृहात असताना जोपासण्यासाठी पोषक वातावरण उपलब्ध करून दिल्यास त्यांच्याकडून विविध कल्पक गोष्टींची निर्मिती होत असते. अशा कारागृह उत्पादित वस्तू लवकरच ई मार्केटप्लसवर नागरिकांना खरेदी करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येईल, असे अपर पोलीस महासंचालक व कारागृह व सुधारसेवाचे महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी सांगितले. तसेच बंदीजनांतील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठीदेखील आगामी कालावधीत विविध प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.
मकर संक्रांती सणानिमित्त कारागृहातील बंदीजनांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीच्या स्टॉलचे गुप्ता यांच्या हस्ते बुधवारी उदघाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, उपमहानिरीक्षक सुनील ढमाळ, येरवडा कारागृह अधीक्षक शिवशंकर पाटील, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव एम. डी. कश्यप उपस्थित होते.
बंदीजनांनी तयार केलेले सागापासून बनवलेले देवघर, चौरंग, पाट, विविध लाकडी टेबल, खुर्ची, कपाटे, गणवेश, सतरंजी साड्या, फाइल्स तसेच शोभेच्या वस्तू अशा विविध वस्तू या प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. हे प्रदर्शन येरवडा येथील कारागृहाच्या उद्योग विक्री केंद्रात २६ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.
अमिताभ गुप्ता म्हणाले की, कारागृह उत्पादित वस्तूंना शासनाच्या विविध विभागांकडून मागणी असते. बंदिजनांनी तयार केलेल्या नवनवीन कल्पक व दर्जेदार वस्तू नागरिकांना खरेदी करता यावे यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. कारागृहात अनेक सुधारणा करणे गरजेचे आहे. कायद्यानुसार बंद्यांना ज्या सोयी-सुविधा देणे गरजेचे आहेत त्या सोयी-सुविधा देण्यात येतील व कायद्यानुसार ज्या सोयी सुविधा देता येणार नाहीत त्याचे काटेकोरपणे पालन केले जाईल. कारागृह उत्पादित वस्तूंची मोठ्या व्यापक प्रमाणात प्रसिद्धी होणे आवश्यक आहे, तसेच कारागृह उत्पादित वस्तू ई-मार्केटप्लेसवर लवकरच खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात येतील.