पिंपरी : तळेगाव दाभाडे येथे येणारी वेदान्त फॉक्सकॉन कंपनी खोके सरकारने गुजरातला पाठविली. त्यामुळे एक लाख तरुणांचा रोजगार हिरावला गेला. राज्यकर्ते सर्वच उद्योग गुजरातला घेऊन जात आहेत. महाराष्ट्रावर अन्याय करण्याचे कलम राज्य घटनेत टाकले आहे का, अशी शंका येतेय. घटनाबाह्य खोके सरकार पुन्हा डोक्यावर बसले, तर ते मंत्रालयही गुजरातला नेतील, अशी टीका माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी रविवारी केली. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाकरे हे रविवारी मावळ दौऱ्यावर होते. लोणावळय़ात व्यायामशाळेचे उद्घाटन, तळेगाव दाभाडे येथे स्वागत आणि पिंपरीत ‘महान्याय, महानिष्ठा’ सभा झाली. खेडचे आमदार दिलीप मोहिते यांचे पुतणे डॉ. शैलेश मोहिते-पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.

हेही वाचा >>>भगवान श्रीराम हे सर्वांचे, आम्ही लवकरच अयोध्येत दर्शनाला जाणार; आदित्य ठाकरे

ठाकरे म्हणाले, की वेदान्त फॉक्सकॉन कंपनी एक लाख लोकांना नोकरी देणार होती. परंतु, हा प्रकल्प गुजरातला नेला. महाराष्ट्रात दोन वर्षांत हा उद्योग सुरू झाला असता. गुजरातमध्ये हा उद्योग सुरू करण्यासाठी आठ वर्षे लागतील असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जात आहेत. विश्वचषकाचा अंतिम सामनाही मुंबईऐवजी गुजरातमध्ये घेण्यात आला. त्यामुळेच भारताचा पराभव झाला.

‘केवळ घोटाळेच सुरू’

पिंपरी महापालिकेत हस्तांतरित विकास हक्क (टीडीआर), कचरा, करोनातही  घोटाळा झाला आहे. घोटाळेबाज सरकारमध्ये केवळ घोटाळेच सुरू आहेत. २०२४ मध्ये आमचे सरकार आल्यानंतर ज्या लोकांनी, मंत्र्यांनी, अगदी मुख्यमंत्री, अधिकाऱ्यांनी जनतेचे पैसे खाल्ले असतील. त्यांना कारागृहात बसवून पैसे मोजायला लावून सरकारच्या तिजोरीत भरायला लावले जातील, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya thackeray criticism that the ministry will shift to gujarat if the coalition government comes amy