पुणे : “माणूसकी आणि विश्वास यांच्या पाठीत खंजीर खूपसून चाळीस गद्दारांनी भाजपाला हाताशी धरून शिवसेनेला संपविण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र, शिवसेना कधीच संपणार नसून, ती अधिक ताकदीने उभी राहील. शिवसेनेला संपविण्याचा प्रयत्न करणाऱ्या गद्दारांना आणि भाजपाला धडा शिकविण्याची संधी चिंचवडच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने मिळाली आहे. बेईमान आणि गद्दारांना धडा शिकविण्यासाठी शिवसैनिकांनी जिवाचे रान करून महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना विजयी करावे,” असे आवाहन युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत चिंचवड विधानसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या बाईक रॅलीदरम्यान उपस्थितांशी संवाद साधताना ठाकरे बोलत होते. थेरगाव येथील गणेश मंदिरापासून बाईक रॅलीला सुरुवात करण्यात आली. यावेळी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेससह सर्व मित्र पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह, कार्यकर्ते व कट्टर शिवसैनिकांनी रॅलीसाठी मोठी गर्दी केली होती.

हेही वाचा – “अजित पवार मोठा माणूस, मला तर..”, अजित पवारांच्या ‘त्या’ विधानावर खासदार उदयनराजेंची प्रतिक्रिया

पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, एका व्यक्तीच्या राक्षसी महत्वाकांक्षेमुळे राज्यात सत्तांतर घडले. शिवसेना संपवण्याची खेळी याच व्यक्तीला हाताशी धरून भाजपाच्या नेत्यांनी केली आहे. त्याचा बदला घेण्याची संधी चिंचवडच्या निवडणुकीमुळे प्राप्त झाली आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर प्रेम करणाऱ्या सच्चा शिवसैनिकांनी नाना काटे यांच्या विजयासाठी जिवाचे रान करावे. जुलमी हुकूमशहाच्या बळावर अख्ख्या पक्षाचे अपहरण करण्याचा डाव आखण्यात आला. परंतू, जनतेच्या मनातील प्रेम आणि निष्ठा याची चोरी कशी करणार? अलीबाबा आणि त्याच्या ४० चोरांना धडा शिकवण्याची संधी या निवडणुकीच्या रुपाने चिंचवडकरांना मिळाली आहे. त्यांची लढाई सत्तेसाठी आहे, तर आपली लढाई ही सत्य आणि लोकशाहीसाठी आहे. त्यामुळे ठाकरे नावावर प्रेम करणाऱ्या आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर प्रेम असणाऱ्या सर्व शिवसैनिकांनी नाना काटे यांना विजयी करून आपली ताकद दाखवून द्यावी.

राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या विकासाचे श्रेय लाटण्यात आणि इतरांच्या विकासकामांवर मते मागताना सध्या विरोधी उमेदवार दिसत आहेत. त्यांनी अथवा त्यांच्या पक्षाने केलेली महत्त्वाची दोन कामे जाहीर करावीत, असे थेट आव्हानच अजित पवार यांनी आजच्या रॅलीदरम्यान दिले. उपस्थितांना संबोधित करताना पवार म्हणाले, उद्योगनगरी, आयटीनगरी कोणी उभी केली, विकासकामे कोणी केली हे येथील जनतेने पाहिले आणि अनुभवले आहे. मात्र ‘खोटं बोल पण रेटून बोल’ या प्रवृत्तीच्या भाजपा नेत्यांनी आम्ही केलेला विकास त्यांचा असल्याचा खोटा प्रचार चालविला आहे. त्यांच्या काळात चिंचवड मतदारसंघासाठी केलेली दोन महत्त्वाची कामे जाहीर करावीत, असे आव्हानच पवारांनी दिले.

हेही वाचा – काँग्रेसचे प्रदेश सचिव सचिन साठे यांचा राजीनामा, पिंपरी पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला फटका?

मतदारसंघाचा आणि शहराचा समान विकास, पुरसे पाणी आणि सोसायटीधारकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. चिंचवड विधानसभेमध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न नाना काटे नक्कीच करतील. ‘विकास विरुद्ध भ्रष्टाचार’ असा हा लढा असून महापालिकेतील सत्ताकाळात भ्रष्टाचाराचा उच्छाद मांडणाऱ्या भाजपाला हद्दपार करून नाना काटे यांच्या माध्यमातून चिंचवडचा विकास करण्याची संधी द्या, असे आवाहनही अजित पवार यांनी यावेळी केले.

मतदारसंघाचे प्रश्न सोडविणार – नाना काटे

महापालिकेत नगरसेवक म्हणून काम करताना मी पिंपळे सौदागरचा विकास केला. माझा वॉर्ड ‘विकासाचे रोल मॉडेल’ म्हणून ओळखला जातो. परंतु, आता त्या वॉर्डाचा विकास आम्ही केल्याचा दावा भाजपावाले करत आहेत. माझे त्यांना जाहीर आव्हान आहे की, जर पिंपळे सौदागरचा विकास त्यांनी केला असा दावा असेल तर सांगवी, पिंपळे गुरवचा ते विकास का करू शकले नाहीत? त्याचे जाहीर उत्तर द्यावे. आम्ही केलेल्या विकासकामांवर मते मागणाऱ्यांना जनता नक्कीच धडा शिकवेल. पिंपळे सौदागरच्या धर्तीवर संपूर्ण चिंचवड मतदारसंघ विकसित करण्यास मी कटीबद्ध असून मला संधी द्यावी व विजयी करावे, असे आवाहन काटे यांनी यावेळी केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya thackeray criticized bjp in chinchwad kjp 91 ssb