काही हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवर डायनॉसोर होते. त्यांना वाटायचं की आपल्या शिवाय कोणीच जगू शकत नाही. सर्वात ताकदवान आपणच आहोत, असे त्यांना वाटायला लागले पण पृथ्वी जसजशी पुढे जाईल, तसतसे बदल होत जातात. अन् एके दिवशी त्या डायनॉसोरचाही नाश झाला. त्यामुळे आपण मानवता म्हणून ठरविले पाहिजे की, आपण कोणत्या दिशेने चाललोय, मार्ग कोणता निवडला आहे. आपल्याला शाश्वत विकास पाहिजे की भकास पाहीजे, याबाबतचा विचार आपण केला पाहिजे, असे मत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पर्यायी इंधन परिषदेच्या कार्यक्रमात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाइन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले. तर उद्योगमंत्री सुभाष देसाई, ऊर्जा मंत्री नितिन राऊत यांच्यासह उद्योजक, गुंतवणूकदार सहभागी झाले होते.

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, “पुणे शहर ऑटो मोटिव्हमध्ये देशात कायम पहिल्या क्रमांकावर राहिले आहे. आता त्यात एक भर पडली आहे, ती म्हणजे पर्यायी इंधन परिषदेचे उदघाटन झाले आहे. इलेक्ट्रिक बाइक, दुचाकी आणि चार चाकी वाहनाचे प्रदर्शनाचे उद्घाटन झाले आहे. या प्रदर्शनाला नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. मागील काही वर्षात इलेक्ट्रिक बाइकला नागरिकांनी खरेदी करण्यास पसंती दिल्याचं आकडेवारीवरून दिसत आहे. ही चांगली बाब असून पर्यावरणाचा विचार सर्वांनी केला पाहिजे,” असे त्यांनी सांगितले.

तसेच ते पुढे म्हणाले की, “आता चांगले फुटपाथ, शाळा, कॉलेज, नद्या यांचं नियोजन करणं गरजेचं आहे. यामध्ये प्रामुख्याने नद्यांमध्ये सांडपाणी जाणार नाही, याबाबत विशेष काळजी घेतली गेली पाहिजे. त्या पार्श्वभूमीवर येत्या काळात या सर्वांचा विचार करून अशा प्रश्नावर परिषद घेतली जाईल, त्यातून अनेक मुद्दे समोर येण्यास मदत होईल,” असे त्यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya thackrey pune speech svk 88 hrc