पुणे : स्वस्त धान्य वितरणासाठी प्रशासनाला दुकानदार मिळत नसल्याचे समोर आले आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील दौंड तालुका वगळता उर्वरित १२ तालुक्यांमध्ये तब्बल २१८ ठिकाणी रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. परवाना मिळविण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबतचा जाहीरनामा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर https://pune.gov.in वर उपलब्ध आहे. या जाहीरनाम्यात अटी व शर्ती, आवश्यक कागदपत्रांचा तपशील, नमुना अर्ज आदीबाबतची माहिती समाविष्ट असून संबंधीत तहसील कार्यालयाच्या पुरवठा शाखेत याबाबत संपूर्ण तपशील आणि अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. इच्छुकांनी विहित मुदतीत अर्ज करावेत, असे जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी सांगितले.
हेही वाचा – राष्ट्रवादीत पक्षांतर्गत वर्चस्ववादाची लढाई?
कारणे काय?
स्वस्त धान्य दुकानांत ई-पॉस यंत्रावर लाभार्थ्यांच्या हाताचा ठसा घेऊनच धान्य द्यावे लागते. तसेच दुकानात येणारे धान्य, वितरित होणारे धान्य याचा सर्व हिशोब संगणक प्रणालीद्वारे नोंदविण्यात येतो. परिणामी स्वस्त धान्य दुकानांत होणाऱ्या गैरप्रकारांना चांगलाच आळा बसला आहे. अचानक तपासणी, स्वच्छता, लाभार्थीला दर महिन्याला किती धान्य मिळाले? कुटुंबाप्रमाणे धान्याचे वाटप झाले की नाही? कुटुंबाने धान्याचा लाभ घेतला की नाही? एका कुटुंबाला किती किलो धान्य मिळाले? याची नोंद संगणकावर ठेवण्यात येते, या पार्श्वभूमीवर स्वस्त धान्य दुकान परवाने घेण्यास दुकान पुढे येत नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
हेही वाचा – पुणे : कोथरूडमध्ये मोटारीच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू
परवाने कुठे उपलब्ध?
बारामतीमध्ये दोन, मावळात ४७, खेडमध्ये सात, आंबेगाव नऊ, इंदापूर दोन, वेल्हे ६८, जुन्नर ३४, पुरंदर आठ, हवेली चार, भोर दहा, शिरूर सहा आणि मुळशी २१ परवाने उपलब्ध आहेत. मात्र, स्वस्त धान्य दुकानांसाठी दुकानदार फारसे इच्छुक नसल्याने प्रशासनाकडून जाहीरपणे अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.