उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पिंपरी-चिंचवडच्या बालेकिल्यातच बलाढय़ राष्ट्रवादीचा कारभार मात्र विस्कळीत असून एलबीटीच्या निमित्ताने नेत्यांमधील सावळा गोंधळ पुन्हा चव्हाटय़ावर आला आहे. महापालिकेत समन्वयाचा अभाव, ठराविक नेत्यांची मनमानी, सत्तारूढ नगरसेवकांचीच अस्वस्थता, आक्रमक विरोधक अशी परिस्थिती असून संघटनात्मक पातळीवर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांच्याविरोधात पक्षातच ‘असहकार’ सुरूच असल्याने ते एकटे पडल्याचे चित्र दिसून येत आहे.
पिंपरी महापालिकेच्या राजकारणात राष्ट्रवादीने विरोधकांचा धुव्वा उडवला आणि एकहाती वर्चस्व मिळवले. पालिकेत राष्ट्रवादीचे निर्विवाद बहुमत असून स्वीकृत व अपक्षांसह १३३ पैकी ९६ नगरसेवक राष्ट्रवादीचेच आहेत. सर्व विषय समित्यांवर राष्ट्रवादीचे एकतर्फी वर्चस्व आहे. असे असतानाही सर्वमान्य नेतृत्व नसल्याने गोंधळाची स्थिती आहे. शहराध्यक्ष बहल व पक्षनेत्या मंगला कदम यांच्याकडे पालिकेचा कारभार असून बहुतांश नगरसेवकांना त्यांची एकाधिकारशाही मान्य नाही. आर. एस. कुमार, शमीम पठाण, विलास नांदगुडे आदी ज्येष्ठ नगरसेवकांनी या संदर्भातील नाराजी वेळोवेळी अन् जाहीरपणे व्यक्त केली आहे. मात्र, अन्य नगरसेवक उघडपणे बोलत नाहीत. कुमार सध्या विरोधी पक्षनेत्याप्रमाणे काम करत आहेत. पिंपरी पालिकेला मिळालेला ‘बेस्ट सिटी’ चा पुरस्कार वशिल्याने व पैसे देऊन मिळाल्याची टीका त्यांनी केली. नेहरू अभियानातील कामांमध्ये १०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून चौकशीची मागणी केली. याशिवाय, त्यांनी उपस्थित केलेले बहुतांश विषयांमुळे राष्ट्रवादीवर तोंड झोडून घेण्याची वेळ आली आहे. मात्र, कुमारांना आवरणे बहल यांना शक्य झाले नाही.
नवे नगरसेवक अस्वस्थ आहेत. निवडणुकीचा खर्च वसूल होण्याची शक्यता नाही. कामे होत नाहीत, पाडापाडीने नागरिकांमध्ये असंतोष आहे. सभागृहात बोलू देत नाही. नेत्यांच्या गटबाजीमुळे काही सुधारत नाही. नेत्यांची दुकानदारी बिघडेल म्हणून ठोस काही करू दिले जात नाही. अजितदादांपर्यंत पोहोचू दिले जात नाही, अशा अनेक मुद्दय़ांवरून पक्षात खदखद आहे. पुण्यात अजितदादांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस ३०-३५ नगरसेवक हजर होते. मात्र निरोपच न मिळाल्याने अनेकजण संतापले आहेत. आपण उगीचच राष्ट्रवादीत आलो, अशी भावना काँग्रेसमधून आलेल्या एका ‘पाहुण्या’ नगरसेवकाने व्यक्त केली. आयुक्तांच्या कार्यपध्दतीवरून नेत्यांचे राजकारण व आदळआपट सुरू आहे. मात्र, आयुक्तांचे काम चांगलेच आहे, अशी भावना काही नव्या नगरसेवकांची आहे. पक्षसंघटनेत शिथिलता आहे. बैठका होत नाहीत, झाल्या तरी फारसे कोणी येत नाही. नगरसेवक हमखास दांडी मारतात. गर्दी जमवण्यासाठी प्रत्येक वेळी अजितदादांच्या नावाचा वापर करावा लागतो. दादा येणार, असा निरोप दिल्याशिवाय कार्यकर्ते, नगरसेवक फिरकत नाहीत, आतापर्यंत हा अनुभव घेणाऱ्या शहराध्यक्षांना एलबीटी आंदोलनात पुनर्प्रत्यय आला. एलबीटीसंदर्भात दिशा ठरवण्यासाठी बैठक बोलावली, मात्र, जेमतेम नगरसेवक हजर राहिले. व्यापाऱ्यांनी पक्ष कार्यालयावर व बहलांच्या घरावर मोर्चा नेऊन निदर्शने केली. मात्र, पक्षात इतके दिग्गज असताना त्यांच्या बाजूने कोणी पुढे आले नाही की साधी प्रतिक्रिया देखील व्यक्त केली नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा