लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : ‘कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी आषाढी वारी सोहळ्याच्या धर्तीवर सुविधा पुरविण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणांचे चोख नियोजन करण्यात आले असून, यंत्रणा सज्ज झाली आहे,’ अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी सोमवारी दिली.

कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी दरवर्षी लाखो अनुयायी येत असून, गेल्या काही वर्षांपासून अनुयायांच्या संख्येत वाढ होत आहे. मंगळवार (३१ डिसेंबर) आणि बुधवार (एक जानेवारी) असे दोन दिवस होणाऱ्या सोहळ्यासाठी जवळपास आठ ते दहा लाख अनुयायी येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाकडून सुविधांचे नियोजन करण्यात आल्याचे डॉ. दिवसे यांनी सांगितले. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील उपस्थित होत्या.

आणखी वाचा-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नव्या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया… झाले काय?

डॉ. दिवसे म्हणाले, ‘दर वर्षी आषाढी वारी सोहळ्यासाठी वारकरी आणि भाविकांच्या दृष्टीने ज्या सुविधा पुरविल्या जातात, त्याच धर्तीवर यंदाच्या विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यात अनुयायांसाठी सुविधा पुरविण्यात येणार आहेत. त्यासाठी महसूल विभाग, पोलीस विभाग, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी), राज्य परिवहन महामंडळ (एसटी), अन्न व औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), समाजकल्याण विभाग, महावितरण, आरोग्य विभाग, माहिती व जनसंपर्क कार्यालय यांच्यासह विविध विभागांच्या साहाय्याने सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे.’

‘अनुयायांना विजयस्तंभाच्या परिसरापर्यंत प्रवास करण्यासाठी आणि पुन्हा नियोजितस्थळी जाण्यासाठीची वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षा यंत्रणा या दोन गोष्टींचे नियोजन करण्यात आले आहे. बुधवारी ५७५, तर गुरुवारी एक हजार ७० मोफत बस ठेवण्यात आल्या आहेत. वाहनांसाठी ४५ ठिकाणी वाहनतळ निश्चित करण्यात आले आहेत. तसेच बसचे मार्ग निश्चित करण्यात आले असून, नियंत्रण कक्ष तयार करण्यात येणार आहे. महिला सुरक्षितता आणि इतर घटनांच्या अनुषंगाने प्रत्येक बसमध्ये सीसीटीव्ही कार्यरत करण्यात आले आहेत,’ असे डॉ. दिवसे यांनी स्पष्ट केले.

आणखी वाचा-पुणे : चालकाच्या दक्षतेमुळे रेल्वे दुर्घटना टळली

‘नियोजनासाठी प्रत्येक विभागातील व्यक्तीची नेमणूक करून नियंत्रण समिती, राजशिष्टाचार समिती, नियोजन समिती, रंगमंच समिती, पास समिती, बुक स्टॉल समिती आदी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत, तर प्रमुख १७ अधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे या प्रशासकीय समितीच्या सदस्य सचिव असणार आहेत,’ असे त्यांनी सांगितले.

‘आरोग्यदूत’द्वारे तत्काळ आरोग्य सेवा

यंदाच्या सोहळ्यात अनुयायांच्या आरोग्याच्या दृष्टीने ‘आरोग्यदूत’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी दुचाकीवरील आरोग्यदूत तत्काळ आरोग्य सेवा देतील, तर आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य तपासणी कक्ष (ओपीडी), २३ आरोग्य केंद्रे, ४३ रुग्णवाहिका विविध ठिकाणी असतील. तसेच महिला व स्तनदा मातांच्या अनुषंगाने ९ हिरकणी कक्ष आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ७ ठिकाणी निवारा केंद्र उभारणी करण्यात आली आहे.

सुरक्षिततेसाठी यंत्रणा

सोहळ्यातील अनुयायांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने भीमा नदीच्या वाहतूक पुलावरील कठड्यांवर जाळ्या उभारण्यात आल्या आहेत. तसेच, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची एक तुकडी तैनात करण्यात येणार असून, चार बोटी सुसज्ज ठेवण्यात येणार आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्याकडून ४४ अग्निशमन वाहने तैनात करण्यात आली आहेत.