पिंपरी: महापालिकेत गेल्या पावणेदोन वर्षांपासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. या राजवटीमधील २०२३-२४ या आर्थिक वर्षातील आठ महिन्यांत स्थापत्य विभागाची ५० टक्क्यांहून अधिक रक्कम विविध विकासकामांवर खर्ची झाली आहे. त्यामुळे प्रशासकीय राजवट सुसाट सुरू असल्याचे दिसून येत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहा हजार कोटींचे अंदाजपत्रक आहे. सन २०२३-२४ च्या अंदाजपत्रकात स्थापत्य विभागासाठी एक हजार १४६ कोटी ८७ लाख १३ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सिमेंटचे रस्ते, उड्डाणपूल, खडी-मुरुमाचे रस्ते, जलवाहिन्यांची कामे, पावसाळी गटार, सांडपाणी नलिकांची कामे, पदपथ, नवीन उद्यानांची कामे स्थापत्य विभागाच्या माध्यमातून केली जातात. स्थापत्य विभागाने चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांत महत्त्वाच्या तीन उड्डाणपुलांच्या कामासह रस्त्याच्या कामासाठी मोठी तरतूद खर्च केली आहे. या विभागासाठी एक हजार १४६ कोटी ८७ लाख १३ हजार रुपयांची तरतूद आहे. या तरतुदीपैकी ५७६ कोटी ८३ लाख रुपये विकास कामांवर खर्च केले आहेत, तर ५७० कोटी चार लाख रुपये इतकी तरतूद खर्च करणे बाकी आहे.
हेही वाचा… मुलांच्या आरोग्याला धोका! शाळांतील अस्वच्छ स्वच्छतागृहांमुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले
चालू आर्थिक वर्षातील आठ महिन्यांत ५० टक्के रक्कम खर्ची झाली असताना उर्वरित ५० टक्के रक्कम चार महिन्यांत खर्च करावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी फेब्रुवारी किंवा मार्च २०२४ मध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे विकासकामे मंजूर करण्यासाठी दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी मिळू शकतो.
विकासकामांवर ५७६ कोटी रुपये खर्च झाले आहेत. ५७० कोटी चार लाख रुपये तरतूद शिल्लक आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता गृहीत धरून उर्वरित तरतूद विविध विकासकामांवर खर्च होईल. – मकरंद निकम, शहर अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका