एलबीटीच्या विरोधात व्यापाऱ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनामुळे नागरिकांची गैरसोय होत असून व्यापाऱ्यांनी जनतेला वेठीस धरण्याचे काम करू नये, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी किवळे येथे बोलताना केले. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आघाडी करण्याचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल, असेही ते म्हणाले.
पुणे महापालिकेचे नगरसेवक मिलिंद काची यांच्या किवळे येथील फार्महाऊसवर उभारण्यात आलेल्या चारा छावणीतून दुष्काळी भागात चारा पाठवण्याचे काम माणिकरावांच्या हस्ते सुरू करण्यात आले. तेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, चंद्रकांत छाजेड, पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड, उपमहापौर दीपक मानकर, िपपरी पालिकेतील विरोधी पक्षनेते कैलास कदम आदी उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले,की महाराष्ट्रातच जकात पध्दती सुरू होती. त्यामुळे जकात रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला. करसाधनेचा पर्याय म्हणून एलबीटी सुरू करण्यात आली. मात्र, त्यास व्यापाऱ्यांनी विरोध सुरू केला असून तो चुकीच्या समजुतीवर आधारित आहे. एलबीटीमुळे ‘पोलीसराज’ येणार नाही. उठसूट कोणीही दुकानांवर धाडी टाकणार नाही. त्याविषयी नाहक गैरसमज पसरवण्यात येत आहेत. विरोधकांकडून विरोधासाठी विरोधाचे राजकारण सुरू आहे. याविषयी लोकांमध्ये जनजागृती करू, असे ते म्हणाले.
डॉ. श्रीकर परदेशी कार्यक्षम अधिकारी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने अवघड जागेचे दुखणे झालेल्या िपपरी पालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या बदलीचे प्रयत्न होत असल्याविषयी पत्रकारांनी विचारणा केली असता, परदेशी सक्षम अधिकारी आहेत व त्यांचे काम चांगले आहे. त्यामुळे त्यांची बदली करण्याचे काहीही कारण नाही, असे मत ठाकरे यांनी व्यक्त केले.