पुणे : राज्यात पुणे-पिंपरी चिंचवड, मुंबई, नागपूर, नाशिक आणि अमरावतीमध्ये अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेअंतर्गत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून पोहोच पावती किंवा हमीपत्र घेऊन तीन महिन्यांची मुदत देऊन कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीतील प्रवेशावेळी काही विद्यार्थ्यांना कागदपत्रे सादर करता आली नाही. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात आल्याचे प्रकार समोर आले. या पार्श्वभूमीवर अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी आर्थिकदृष्ट्या मागास (ईडब्ल्यूएस) प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले मिळण्यास अडचणी निर्माण झाल्याने उत्पन्नाचे दाखले मिळण्यासाठी प्रस्ताव दाखल केलेल्या विद्यार्थ्यांकडून हमीपत्र घेऊन, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र नसणाऱ्या विद्यार्थ्यांना पोहोच पावती किंवा हमीपत्र घेऊन तीन महिन्यांची मुदत देऊन कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश देण्यात यावा, असे शालेय शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी विवेक सपकाळ यांनी स्पष्ट केले.