लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिली जाणार आहे. या विद्यार्थ्यांचे प्रवेश १८ मार्चपासून सुरू होणार असून, प्रवेशासाठी २४ मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. यंदा राज्यातील ८ हजार ८६३ शाळांमध्ये १ लाख ९ हजार ८७ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी ३ लाख ५ हजार १५२ अर्ज दाखल झाले होते. प्रवेशासाठी काढलेल्या सोडतीद्वारे १ लाख १ हजार ९६७ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. त्यानंतर १० मार्चपर्यंत ६९ हजार ६१० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. त्यामुळे उर्वरित जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या पहिल्या टप्प्यातील प्रवेश १८ मार्चपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना लघुसंदेश पाठवला जाणार आहे. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी रिक्त जागांनुसारच लघुसंदेश पाठवण्यात येईल. मात्र, पालकांनी केवळ लघुसंदेशावर विसंबून न राहता आरटीई संकेतस्थळावरील अर्जाची स्थिती पाहणे आवश्यक आहे. पालकांनी प्रवेश मिळालेल्या पत्राची मुद्रित प्रत आणि आवश्यक कागदपत्रांसह नजीकच्या पडताळणी केंद्रावर जाऊन पडताळणी समितीकडून २४ मार्चपर्यंत कागदपत्रांची तपासणी करून ऑनलाइन प्रवेश निश्चित करावा. प्रवेश निश्चित झाल्याची पावती घेऊन शाळेत जाऊन प्रवेश घ्यावा, असे गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.