पुणे : राज्यातील अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.त्यानुसार गेली काही वर्षे पाच ठिकाणी राबवण्यात येणारी अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष २०२५-२६पासून राज्यभरात केंद्रीय ऑनलाइन पद्धतीनेच राबवण्यात येणार आहे.

शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. गेली काही वर्षे मुंबई महानगर क्षेत्र (एमएमआरडीए), पुणे-पिंपरी-चिंचवड, अमरावती, नागपूर आणि नाशिक या महानगरपालिका क्षेत्रांत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. या प्रवेश प्रक्रियेची उपयोगिता लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांच्या सात कलमी कृती उद्दिष्टांमध्ये समाविष्ट असलेल्या ‘इज ऑफ लिव्हिंग’ उद्दिष्टानुसार विद्यार्थी, पालकांचा वेळ, पैसा आणि श्रम याचा अपव्यय टाळण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून अकरावीची केंद्रीय ऑनलाइन प्रवेश पद्धती राज्यभर राबवण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. संपूर्ण प्रवेश प्रक्रियेची अंमलबजावणी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक स्तरावरून करण्यात येईल, तर शिक्षण आयुक्तांचे प्रवेश प्रक्रियेवर नियंत्रण राहणार आहे.

मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद, लातूर, कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडून उच्च माध्यमिक शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांकडून नोंदणी अर्जामध्ये नमूद केलेली माहिती (उदाहरणार्थ – शाखानिहाय तुकड्या, अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित, वर्गनिहाय व शाखानिहाय विद्यार्थी प्रवेश क्षमता, कनिष्ठ महाविद्यालयात उपलब्ध असलेले विषय) तपासून माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक यांनी निश्चित केलेल्या ऑनलाइन सेवा पुरवठादारास ठरलेल्या कालावधीत उपलब्ध करून देतील. प्रवेश प्रक्रिया राज्य स्तरावर राबवण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविणे आणि अन्य पूर्वतयारी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांच्या स्तरावर करावी. तसेच प्रवेश प्रक्रिया राज्य स्तरावर राबविण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध कराव्यात. ऑनलाइन प्रवेश पद्धतीविषयी विद्यार्थी आणि पालकांचा माहिती उपलब्ध करून द्यावी, आवश्यकता असल्यास प्रशिक्षणासाठी दृक्श्राव्य चित्रफीत उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

चार फेऱ्यांनंतर वर्ग सुरू

प्रवेश प्रक्रियेत नियमित चार फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर अकरावीचे वर्ग सुरू करावेत. त्यानंतर उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर सर्वांसाठी खुले प्रवेश ठेवावेत. हे प्रवेश गुणवत्तेच्या आधारावर करावेत. याबाबतचे आदेश विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना द्यावेत. अकरावीत प्रवेशित होणाऱ्या शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेच होईल, असे नमूद करण्यात आले आहे.

Story img Loader