पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून येत्या १० नोव्हेंबरला शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांना प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यानुसार उमेदवारांना परीक्षेच्या दिनाकांपर्यंत प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे. राज्यातील एकूण १०२९ परीक्षा केंद्रांवर टीईटी होणार आहे. यात ‘पेपर एक’साठी एक लाख ५२ हजार ५९७ उमेदवारांनी नोंदणी आहे. पेपर एकची परीक्षा ४३१ परीक्षा केंद्रावर सकाळी साडेदहा ते दुपारी एक या वेळेत होणार आहे.
हेही वाचा >>> बीबीए, बीसीए अभ्यासक्रमांच्या जागा रिक्त… नेमके काय झाले?
तर, दुपारी अडीच ते सायंकाळी पाच या वेळेत दोन लाख एक हजार ३४० उमेदवार ‘पेपर दोन’ची परीक्षा देणार आहेत. प्रवेशपत्र डाऊनलोड केल्यानंतर उमेदवारांना त्याची मुद्रित प्रत घ्यावी लागणार आहे. प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. टीईटी परीक्षा घोटाळा उघडकीस आल्यानंतर परीक्षा अत्यंत पारदर्शक आणि सुरळीतपणे घेण्यासाठी राज्य परीक्षा परिषदेने ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचा विचार केला होता. मात्र, परीक्षेच्या प्रश्नपत्रिका विविध भाषांमध्ये तयार करण्यात अडचणी येत असल्याने परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय झाला. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी सीसीटीव्ही आणि बायोमेट्रिक प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.