मूल दत्तक घ्यायचे म्हटले की ते निरोगीच हवे ही पालकांची पहिली अपेक्षा असते. बाळाला जराशी जरी आरोग्याची तक्रार असली, तरी त्याला दत्तक घ्यायला पालक तयार होत नाहीत. मग जर दत्तक जाणाऱ्या बाळाला हृदयाशी संबंधित त्रास असेल, तर त्याला पालक मिळतील का हा मोठाच प्रश्न! पण या वर्षी ‘सोफोश’ (सोसायटी ऑफ फ्रेंड्स ऑफ ससून हॉस्पिटल) या संस्थेतील हृदयाला छिद्र असलेल्या तीन बाळांना आई-बाबा मिळाले आहेत. विशेष म्हणजे या मुलांना दत्तक घेणारी तीनही दांपत्ये पुण्यातील आहेत.  
दत्तक घेणाऱ्यांची भूमिकेत काळानुसार हळूहळू सकारात्मक बदल होत असल्याचे दिसून येत आहे. ‘निरोगीच मूल हवे’ पासून ‘आम्हाला मूल हवे, मग त्याला एखादा आजार असला, तरी आम्ही आमचंच मूल असल्याप्रमाणे त्याची काळजी घेऊ,’ या विचारापर्यंत दत्तक घेणारे पालक येऊन ठेपले आहेत. या वर्षी ‘सोफोश’मधून देशात झालेल्या दत्तकविधानांची संख्या ७३ होती. यातील ३ बाळांच्या हृदयाला छिद्र आहे तर २ बाळांना ऐकण्याशी संबंधित सौम्य तक्रारी आहेत, तसेच त्यांचे वजन थोडेसे कमी आहे. या व्यतिरिक्त २ बाळांच्या पूर्वीच्या पालकांना विशिष्ट आजारांची पाश्र्वभूमी होती. या पाश्र्वभूमीचा कोणताही बाऊ न करता या दोन बाळांनाही नव्या पालकांनी समजून-उमजून आनंदाने आपलेसे केले आहे. ही सर्व बाळे ३ ते ६ महिने या वयोगटातील आहेत. संस्थेच्या दत्तकविधान समन्वयक संगीता पवार यांनी ही माहिती दिली.
गेल्या वर्षीपर्यंत दत्तक पालकांमध्ये फारसा न दिसणारा हा सकारात्मक ‘ट्रेंड’ आता कमी प्रमाणात का होईना पण बघायला मिळतो आहे, असे पवार यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, ‘‘बाळ दत्तक घेण्याचा निर्णय घेतलेल्या पालकांनी येणारे बाळ निरोगी असावे अशी अपेक्षा करण्यात काही चूक नाही. पण आता यापुढे विचार करण्यास आणि प्रसंगी अतिरिक्त जबाबदारी उचलण्यास पालकांनी तयार होणे ही आनंदाची बाब आहे. एखादा आजार किंवा आरोग्याची लहानशी तक्रार असलेल्या बाळाला दत्तक घेण्यास त्यांनी तयारी दाखवली की संस्थेचे डॉक्टर आणि गरज भासल्यास इतर तज्ज्ञ डॉक्टरांबरोबर पालकांना चर्चा करण्याची संधी मिळते. बाळाच्या आरोग्याबाबत पूर्ण माहिती घेतल्यानंतरच पालक त्यांचा निर्णय घेतात.’’
आरोग्याच्या तक्रारी बऱ्या होण्यासारख्या
काही बाळांना त्या-त्या वेळी आरोग्याच्या तक्रारी असल्या, तरी त्या काही कालावधीच्या उपचाराने बऱ्या होण्यासारख्या असतात, असेही संगीता पवार यांनी सांगितले. उदा. बाळाला ऐकण्यासंबंधीची सौम्य तक्रार असली आणि त्याची ‘बेरा’ चाचणी सामान्य आली नाही, तरी २-४ महिन्यांच्या उपचारानंतर ही चाचणी सामान्य येऊ शकते. बाळाला अस्थमासदृश विकार असेल, तरी तो देखील काही कालावधीनंतर बरा होऊ शकतो. बाळाच्या पूर्वीच्या पालकांपैकी कुणाला तरी एखादा विशिष्ट आजार असेल आणि बाळाला तो आजार नसेल, तरी ‘सोशल स्टिग्मा’मुळे त्याला नवे पालक मिळण्यात अडचणी येतात. पण हा समजही हळूहळू बदलत असल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader