लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: एकतर्फी प्रेमातून बिबवेवाडी भागात १३ वर्षीय कबड्डीपटू मुलीच्या निर्घृण खून प्रकरणात विशेष सरकारी वकील ॲड. हेमंत झंझाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ॲड. झंझाड फाैजदारी वकील असून ते पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष आहेत. १२ ऑक्टोबर २०१२ रोजी बिबवेवाडीतील यश लाॅन्सजवळ मैदानात शाळकरी मुलगी कबड्डीच्या सरावासाठी गेली होती. त्या वेळी आरोपी शुभम उर्फ ऋषिकेश बाजीराव भागवत (वय २२) याने मुलीवर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन तिचा निर्घृण खून केला होता. शाळकरी मुलीवर त्याने ४२ वार केले होते. एकतर्फी प्रेमातून शाळकरी मुलीचा खून झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पुणे शहरात खळबळ उडाली होती तसेच विधानसभेत या बाबत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.
ॲड. झंझाड यांनी राजकीय वैमनस्यातून झालेल्या पिंपरीतील सांगवी परिसरातील तुषार ढोरे खून प्रकरण, दौंड येथील पोलीस कर्मचारी संजय शिंदेकडून करण्यात आलेल्या दुहेरी खून प्रकरण, पंढरपूर येथील नगरसेवक संदीप पवार खून प्रकरण तसेच लोणावळ्यातील पोलीस कर्मचारी अतुल साठे यांच्या खुनाचा प्रयत्न प्रकरण खटल्याचे कामकाज पाहिले आहे.