पुणे: अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात त्याची मैत्रीण ॲड. प्रज्ञा कांबळे सामील असल्याचे तपासात उघडकीस आले असून, लवकरच तिला अटक करण्यात येणार आहे. ससून रग्णालयातून ललित पसार झाल्याप्रकरणी ललितच्या मैत्रिणी ॲड. कांबळे आणि अर्चना निकम यांना अटक करण्यात आली होती. न्यायालयाने दोघींची सोमवारी येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. पोलिसांनी ॲड. कांबळेची पोलीस कोठडी मागण्याचे हक्क अबाधित ठेवले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ससून रुग्णालयातून मेफेड्रोन विक्री, तसेच पसार झाल्याप्रकरणी ललित पाटीलसह साथीदारांविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ललितला पसार होण्यास मदत केल्याप्रकरणी ललितच्या मैत्रिणी ॲ्रड. कांबळे आणि निकम यांना अटक करण्यात आली होती. ॲड. कांबळे ललितच्या अमली पदार्थ विक्री व्यवसायात सामील असल्याने तिला याप्रकरणात सहआरोपी करण्यात आले आहे.

हेही वाचा… “…अन्यथा ललित पाटीलला पोलीस बनावट चकमकीत मारतील”, रवींद्र धंगेकरांचं विधान

अमली पदार्थ विक्रीतून मिळालेल्या पैशांमधून महागडी मोटार खरेदी, हप्ते ललितचा भाऊ भूषण यांच्या बँक खात्यातून भरले जात होते. नाशिकमधील शिंदे गावात सुरू करण्यात आलेल्या मेफेड्रोन निर्मितीच्या कारखान्याची माहिती ॲड. कांबळेला होती. तिथे काम करणारा कामगार जिशान शेख कारखान्याची जबाबदारी सांभाळत होता. कांबळे ललितच्या अमली पदार्थ विक्री व्यवसायात सामील असल्याने तिच्या अटकेसाठीचे वाॅरंट पोलिसांनी न्यायालयात सादर केले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. सी. बिराजदार यांनी ॲड. कांबळेला बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अमली पदार्थ विक्री प्रकरणात अटक करण्यास पोलिसांना परवानगी दिली. ललितचा भाऊ भूषण आणि साथीदार अभिषेक यांना अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. सोमवारी त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपली. दोघांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याची विनंती करण्यात आली होती .ललित ससून रुग्णालयातून पसार झाल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात येणार आहे. याप्रकरणात पोलिसांनी दोघांचा ताबा मागितला आहे.

ॲड. प्रज्ञा कांबळेला न्यायालयात रडू कोसळले

ॲड. कांबळेने याप्रकरणाशी संबंध नसल्याचे सांगितले होते. ललितला मदत करण्यास मदत केल्याप्रकरणी ॲड. कांबळे आणि तिची मैत्रीण अर्चना यांना अटक करण्यात आली होती. दोेघींच्या पोलीस कोठडीची मुदत सोमवारी संपली. न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्यानंतर जामीनाचा मार्ग मोकळा होईल, असे ॲड. कांबळेला वाटले होते. मात्र, ललितच्या अमली पदार्थ व्यवसायात ॲड. कांबळे सामील असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. तिला अटक करण्याचे हक्क पोलिसांनी राखून ठेवले. त्यानंतर ॲड. कांबळेला न्यायालयात रडू कोसळले

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adv pradnya kamble is involved in the case of drug smuggler lalit patil and she will be arrested soon pune print news rbk 25 dvr