यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मुले, महिला, तरुण आणि भटकण्याची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी विविध संस्थांनी अनेक साहसी मोहिमा आखल्या आहेत. ताम्हिणी घाट, त्र्यंबकेश्वर पासून लेह, लडाख आणि थेट हिमालयात फिरण्याची संधी साहसप्रेमी लोकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सुट्टीनिमित्त झेप, इनसर्च आऊटडोअर्स, भोंसला अॅडव्हेंचर फाऊंडेशन्स आणि निसर्ग जागर प्रतिष्ठान या आणि यांसारख्या अनेक संस्थांनी विविध वयोगटांसाठी पदभ्रमण, गिर्यारोहण, रॅपलिंग, रॉक क्लायम्बिंग, व्हॅली क्रॉसिंग, जुमारिंग, ट्रॅकिंग, वॉटर राफ्टिंग, कयाकिंग, रायफल शूटिंग यांसारखे विविध साहसी खेळ आयोजित करण्यात आले आहेत. ज्यांना मोटर सायकलवरून हिंडायला आवडते, त्यांच्यासाठी बायकिंग टुर्सही आहेत. त्यानिमित्ताने लोकांना निसर्गाच्या सानिध्यात काही दिवस घालवता येणार आहेत.
‘झेप’ या संस्थेने उत्तरांचल गढवाल प्रदेशात उत्तरकाशीजवळ दोडीताल-दारवा ग्लेशियर ट्रेकचे आयोजन केले आहे. दोडीताल सरोवरापासून या मोहिमेची सुरुवात होणार आहे. त्यानंतर पदभ्रमंती करीत दारवा ग्लेशियपर्यंतची मोहीम आखण्यात आली आहे. भोंसला फाऊंडेशन्सतर्फे १२ ते २० वयोगटातील मुला-मुलींसाठी एप्रिल, मे आणि जून या महिन्यांमध्ये ७ दिवसांच्या साहस शिबिरांचे आयोजन त्र्यंबकेश्वर येथे केले आहे.
ज्यांना पायी भटकायला आवडते त्यांच्यासाठी हिमालयामध्ये १३ दिवसांच्या पदभ्रमण यात्रेचे आयोजन ‘निसर्ग जागर प्रतिष्ठान’तर्फे करण्यात आले आहे. रोजची ९ तासांची पदभ्रमंती करण्यात येणार आहे. ही यात्रा १७ ते २९ मे या कालावधीत होणार आहे. ‘इनसर्च आऊटडोअर्स’ संस्थेतर्फे विद्यार्थ्यांसाठी, लहान मुलांसाठी आणि खुल्या वयोगटासाठी साहस शिबिरे, ट्रेक्स आणि बायकिंग टुर्सचे आयोजन करण्यात आले आहे. हृषिकेश, काझिरंगा-तवांग, कॉरबेट बिनसार, ताडोबा या ठिकाणी साहस शिबिरे आयोजित केली आहेत. तर ५ ते १२ वयोगटातील मुलांना ताम्हिणी, कर्जत सारख्या ठिकाणी जाण्याची संधी मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी-
झेप- ८०८७४४८२९७/ ९८५००००४८७
भोंसला फाऊंडेशन्स- ९८८१५४७२८०/ ९८५०९९६१९८
इनसर्च आऊटडोअर्स- ०२०-२५४४३०९६/९७/९९, ९८५०८२६४३१
निसर्ग जागर प्रतिष्ठान- ९९२२४१४८२२