पुणे : शहरात थंडीचा कडाका वाढू लागला आहे. हिवाळ्यातील हवा थंड आणि कोरडी असल्याने आपली प्रतिकारशक्ती कमकुवत होते. यामुळे श्वसनविकारांसह विषाणूजन्य आजारांमध्ये वाढ होण्याची शक्यता आरोग्यतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यामुळे काळजी घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.
हिवाळ्यात दिवस छोटा आणि रात्र मोठी असते. त्यामुळे नागरिकांचा सूर्यप्रकाशात राहण्याचा वेळही कमी होतो. त्यातून शरीरातील ड जीवनसत्वाची पातळी कमी होऊन प्रतिकारशक्ती कमकुवत होते. थंडीच्या काळात नागरिक अधिक काळ घरात थांबत असल्याने जंतूसंसर्ग वेगाने पसरतो. यामुळे फ्ल्यू, सांधेदुखी अशा तक्रारी सुरू होतात. अशा तक्रारी टाळण्यासाठी बदलत्या हवामानानुसार आहार आणि जीवनशैलीत बदल करावा, असे आरोग्यतज्ज्ञांनी म्हटले आहे.
हेही वाचा >>>पुणे आवडे पंतप्रधानांना!
याबाबत ससून सर्वोपचार रुग्णालयातील औषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. रोहिदास बोरसे म्हणाले की, थंडीत दम्यासह श्वसनविकाराच्या रुग्णांना अधिक त्रास होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी त्रास सुरू झाल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अन्यथा त्रास वाढून गुंतागुंत होण्याचा धोका निर्माण होतो. अचानक तापमान कमी झाल्यामुळे हे वातावरण विषाणूंच्या वाढीला पोषक ठरते. त्यामुळे या कालावधीत विषाणूजन्य आजारांमध्ये वाढ होते. याचबरोबर ताप, सर्दी खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ होते.
हेही वाचा >>>भोसरीत दुरंगी; पण तुल्यबळ लढत
थंडीमुळे शारीरिक तक्रारी
– सर्दी, खोकल्यासह फ्ल्यूचा त्रास
– दमा, ॲलर्जीचा त्रास, श्वसनविकार
– सांधेदुखी, आर्थ्रायटिस
– रक्तवाहिन्यांचे आकुंचन होऊन रक्तदाब वाढणे
– ड जीवनसत्वाची कमतरता
काळजी काय घ्यावी?
– उबदार कपडे परिधान करावेत.
– थंडीपासून संरक्षण स्वत:चे करावे.
– वातानुकूलन यंत्रांचा वापर टाळा.
– नियमितपणे व्यायम करा.
– शरीराला पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल याची काळजी घ्या.
– त्रास झाल्यास तातडीने डॉक्टरांना दाखवा.
© The Indian Express (P) Ltd