पुणे : पुणे रेल्वेस्थानकाच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून विभागीय सल्लागार समितीच्या सदस्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांचा बलात्कार प्रकरणातील सहभाग, वाहनतळाची समस्या आणि रेल्वेस्थानक परिसरातील अतिक्रमणाच्या मुद्द्यावर सदस्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला, अशी माहिती सूत्रांनी दिली.
विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय रेल्वे सल्लागार समितीची बैठक झाली. वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे या बैठकीचे समन्वयक होते. समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी, गोपाळ तिवारी, बशीर सुतार, सुरेश माने, किशोर भोरावत, निखिल काची, तानाजी कराळे, ॲड. आप्पासाहेब शिंदे, अजित चौगुले, दिलीप बटवाल, विजय चव्हाण या बैठकीला उपस्थित होते.
हेही वाचा >>> पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेला टँकरमाफियांचा वेढा…कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव
पुणे रेल्वे स्थानकावर पुरेशा प्रमाणात फलक बसवणे, लिफ्ट आणि एस्केलेटरची सुविधा, सीसीटीव्ही, सुरक्षा, पार्किंग समस्या याबाबत सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले. स्थानकावर प्रवासी सुविधा विकसित करण्यासोबत स्थानक अतिक्रमणमुक्त करण्याची मागणी करण्यात आली. रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांचा गैरप्रकारांमध्ये सहभाग असूनही कार्यवाही होत नसल्याबद्दल सदस्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावर योग्य ती पावले उचलण्याचे आश्वासन विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी दिले. बैठकीस सर्व शाखाधिकारी उपस्थित होते. विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे यांनी आभार मानले.
हेही वाचा >>> तुमचा आरोग्य विमा आहे? जाणून घ्या ‘कॅशलेस’ सुविधा न मिळण्याची कारणे…
पुणे-नागपूर आणि पुणे-हावडा या गाड्यांना सातत्याने विलंब होत आहे. या गाड्यांचा वक्तशीरपणा राखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रयत्न करावेत. किमान गाडी किती वेळ मधील स्थानकावर थांबणार याची पूर्वकल्पना तरी प्रवाशांना रेल्वेने द्यावी.
– निखिल काची, सदस्य, विभागीय रेल्वे सल्लागार समिती
सदस्यांनी मांडलेले मुद्दे
– पुणे-कोल्हापूर दरम्यान इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू करा.
– मुंबई-कोल्हापूर सह्याद्री एक्स्प्रेस पुन्हा सुरू करावी.
– पुणे-मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेसला चिंचवडमध्ये थांबा द्यावा.
– पुणे-लोणावळा लोकलची संख्या वाढवणे
– कोल्हापूरवरून कलबुर्गी गाडी सुरू करावी. – मिरज ते बेळगावी, पंढरपूर, सातारा नवीन गाड्या सुरू कराव्यात.