पुणे शहर व जिल्ह्य़ातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनची वार्षिक निवडणूक शनिवारी (३० जानेवारी) होत आहे. बार असोसिएशनच्या निवडणुकीत यंदा प्रथमच वकिलांना नकाराधिकाराचा पर्याय (नोटा) उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्या बरोबरच यंदाच्या निवडणुकीसाठी सीसी टीव्ही यंत्रणेचाही वापर प्रथमच केला जाणार आहे.
शहर आणि जिल्ह्य़ातील पाच हजार वकील पुणे बार असोसिएशनचे सदस्य आहेत. शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात शनिवारी सकाळी नऊ ते सायंकाळी साडेपाच या वेळेत संघटनेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. न्यायालयाच्या आवारातील अशोका सभागृह व नवीन इमारतीमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे मतदान प्रक्रिया पार पडेल. गेल्या वर्षीही इलेक्ट्रॉनिक मशिनद्वारे मतदान झाले होते. शनिवारी रात्री मतमोजणी झाल्यानंतर विजयी उमेदवारांची नावे घोषित करण्यात येईल, अशी माहिती सहनिवडणूक अधिकारी अ‍ॅड. अनिल देसाई यांनी दिली.
यंदाच्या निवडणुकीत वकिलांना नकाराधिकाराचा (नोटा) पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे वकील त्यांच्या पसंतीच्या उमेदवारांना मतदान करतील. तसेच नोटाचाही वापर करू शकतील. अध्यक्षपदासाठी अ‍ॅड. सुरेश जाधव, अ‍ॅड. प्रसाद कुलकर्णी, अ‍ॅड. भजनलाल निमगांवकर आणि अ‍ॅड. यशवंत शिंदे हे चार उमेदवार रिंगणात आहेत तसेच कार्यकारिणीच्या विविध पदांसाठी तेरा उमेदवार रिंगणात आहेत. पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. एन. डी. पाटील हे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. उपनिवडणूक अधिकारी म्हणून अ‍ॅड. अशोक शिरसाट आणि अ‍ॅड. राजेंद्र दौेंडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे अ‍ॅड. देसाई यांनी सांगितले.
गैरप्रकारांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर
गेल्या वर्षी बार असोसिएशनच्या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर करण्यात आला होता. त्यावेळी काही उमेदवारांनी मतदान प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचे करण्यात आले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत प्रथमच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे दुबार मतदान तसेच अन्य गैरप्रकारांना आळा बसेल. न्यायालयातील अशोका सभागृह आणि नवीन इमारतीत मतदान होणार आहे.