धान्य खरेदी करताना शिधापत्रिकेची गरज नाही

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वस्त धान्य दुकानांमध्ये होणारा काळा बाजार रोखण्यासाठी शहरातील अकरा परिमंडळांपाठोपाठ जिल्हय़ातही आधारवर आधारित सार्वजनिक वितरण व्यवस्था (आधार एनेबल पब्लिक डिस्ट्रिब्युशन सिस्टीम- एईपीडीएस) कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यासाठी पुरवठा विभागाने सर्व दुकानदारांना पॉस यंत्रे (पॉइंट ऑफ सेल- पीओएस) उपलब्ध करून दिली आहेत. या यंत्राच्या साहाय्याने लाभार्थ्यांच्या आधारकार्डची माहिती आणि अंगठय़ाचा ठसा घेण्यात येत आहे. धान्य घेताना लाभार्थ्यांना पॉस यंत्रावर आपल्या अंगठय़ाच्या ठशाची जुळणी करूनच धान्य घ्यावे लागणार आहे. त्यामुळे धान्य खरेदी करताना शिधापत्रिकेची गरज भासणार नाही.

राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधील कारभार पारदर्शक होण्यासाठी अन्नधान्य वितरण पुरवठा विभागाने एईपीडीएस व्यवस्था सुरू केली आहे. या व्यवस्थेसाठी दिल्ली एनआयसीने एईपीडीएस ही संगणकीय प्रणाली तयार केली आहे. तसेच पुरवठा विभागाने राज्यातील सर्व स्वस्त धान्य पुरवठा दुकानांमध्ये पॉस यंत्रे उपलब्ध करून दिली आहेत. या यंत्राद्वारे सर्व नागरिकांच्या आधार कार्डची माहिती आणि अंगठय़ांचे ठसे घेतले जात आहेत. ही माहिती घेतल्यानंतर सर्व माहिती सव्‍‌र्हरवर साठविण्यात येत आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानात गेल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांचा अंगठय़ाचा ठसा यंत्रावर घेऊन तो जुळल्यानंतर संबंधिताला त्याच्या नावावरील धान्य वाटप केले जाणार आहे.   या प्रणालीमुळे दुकानदारांचा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप होणार नसून दुकानातून किती धान्याचे वितरण झाले, याची माहितीही पुरवठा विभागाला मिळणार आहे. तसेच पॉस यंत्रावर लाभार्थ्यांची माहिती उपलब्ध असल्याने स्वस्त धान्य दुकानात धान्य घेताना शिधापत्रिकेची गरज राहणार नाही. पुणे ग्रामीण वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यंमध्ये एईपीडीएस व्यवस्थेनुसार नागरिकांच्या माहितीचे संकलन करण्यात आले आहे. एप्रिलपासून या व्यवस्थेद्वारेच जिल्हय़ात धान्य वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती पुरवठा विभागाच्या उपायुक्त नीलिमा धायगुडे यांनी दिली.

.. तर टोकनद्वारे धान्य मिळणार

ज्या लाभार्थ्यांची माहिती एईपीडीएस व्यवस्थेमध्ये संकलित करण्यात आलेली नाही, अशा नागरिकांना टोकनद्वारे धान्य वितरित केले जाणार आहे, मात्र टोकन देताना संबंधित लाभार्थ्यांची माहिती पॉस यंत्राद्वारे संकलित करून घेतली जाणार आहे, असे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aepds system in cheap grain shop