पुण्यातील डॉ. गणेश राख यांना आमंत्रण
भक्ती बिसुरे, पुणे</strong>
स्त्रीभ्रूणहत्येच्या वाढत्या समस्येला तोंड देण्यासाठी बेटी बचाओ जनआंदोलन हाती घेतलेल्या पुण्यातील डॉ. गणेश राख यांच्या कार्याची दखल घेत आफ्रिकेतील देशांनी डॉ. राख यांचा कित्ता गिरवण्यास सुरुवात केली आहे. आफ्रिकेतील झांबिया आणि इतर मागास देशांमधील स्त्रीभ्रूणहत्येच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी तेथील स्वयंसेवी संस्था आणि समाजसेवकांनी डॉ. राख यांना मार्गदर्शनासाठी निमंत्रित केले आहे.
सन २०१२ पासून डॉ. गणेश राख यांनी वैयक्तिक पातळीवरून स्त्रीभ्रूणहत्येविरोधात काम करण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांच्या रुग्णालयात बाळंतपणासाठी दाखल झालेल्या गर्भवती महिलेने मुलीला जन्म दिला असता त्या मुलीचे स्वागत करण्यासाठी प्रसूतीचा संपूर्ण खर्च माफ करण्याचा निर्णय डॉ. राख यांनी घेतला आणि तो अमलातही आणला. त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र मोठय़ा प्रमाणावर कौतुक झाले.
काही संवेदनशील डॉक्टरांनीही या निर्णयाचे अनुकरण करण्यास सुरुवात केली. डॉ. राख यांनी मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी सुरू केलेल्या या मोहिमेने व्यापक स्वरूप घेतले असून, सद्य:स्थितीत महाराष्ट्रातच नव्हे तर मध्य प्रदेश, कर्नाटक, बिहार या राज्यांतील डॉक्टर आणि संघटनांनी या मोहिमेला पाठिंबा दर्शवला आहे. मुलगी जन्माला आल्यास प्रसूतीच्या खर्चात सवलत देणे किंवा मुलींवर उपचार करण्याच्या शुल्कावर सूट देणे अशा स्वरूपात अनेक डॉक्टर या मोहिमेला त्यांचा हातभार लावत आहेत.
डॉ. गणेश राख म्हणाले, २०१७-१८ या वर्षांच्या भारतीय आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार गेल्या दहा वर्षांमध्ये पाच वर्षांखालील वयाच्या सुमारे सहा कोटी मुलींचा मृत्यू झाला आहे. हे चित्र भयानक आणि चिंतावह आहे. यावर उपाय म्हणून मुलींच्या जन्माला प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे. राज्यासह देशात काही ठिकाणी ही चळवळ रुजत असताना आफ्रिकेतील झांबिया या देशाकडून ही मोहीम तेथे राबवण्यासाठी काही समाजसेवकांनी संपर्क साधला आहे. फेब्रुवारी महिन्यात तेथे एका रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, मुलींचा जन्मदर वाढवण्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. स्त्रीभ्रूणहत्येविरोधात जगभरामध्ये काम करणाऱ्या अनेक डॉक्टर आणि कार्यकर्त्यांसह हे निमंत्रण मिळणे हे माझे एकटय़ाचे नव्हे तर संपूर्ण जनआंदोलनाचेच यश आहे.
समाज माध्यमांची ताकद स्पष्ट
आफ्रिका खंडातील झांबिया देशात स्त्रीभ्रूणहत्या आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या वेटी टेम्बो या आफ्रिकन कार्यकर्त्यांला समाज माध्यमांवरील चर्चेतून पुण्यातील डॉ. राख यांनी मुलींच्या जन्मानंतर पालकांना प्रसूतीचा संपूर्ण खर्च माफ केल्याचे समजले. डॉ. राख यांच्या या मोहिमेचा समाज माध्यमांतून अभ्यास केल्याने मोहिमेची परिणामकारकता जाणवली असून, त्यामुळे त्यांना निमंत्रित करत असल्याचे टेम्बो यांनी आपल्या निमंत्रणात म्हटले आहे.