हिंजवडी येथे एक महिला व तिच्या दीड वर्षांच्या मुलीचा खून करून पळालेल्या भोंदूबाबाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. या भोंदूबाबाने वीस वर्षांपूर्वी नागपूर येथे त्याची पत्नी आणि चार वर्षांच्या मुलीचा खून केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
दत्तमहाराज ऊर्फ जी. कनकाराजू (वय ६०, रा. सिद्धीपेठ, मेदक, आंध्र प्रदेश) असे अटक केलेल्या भोंदूबाबाचे नाव आहे. हिंजवडी येथील माण येथे ६ एप्रिल रोजी त्याने सुभद्रा काशिराम चव्हाण (वय ३५) आणि तिची दीड वर्षांची मुलगी बसंती हिचा खून केला होता. त्यानंतर तो विविध राज्यात जाऊन देवस्थानावर राहात होता. त्याचा शोध घेऊन अटक करण्यात आली आहे, अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे यांनी दिली.
भामरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भोंदूबाबा आणि सुभद्राचे वडील जगन्नाथ काळे (रा. गुलबर्गा) यांची पूर्वीची ओळख होती. सहा महिन्यांपूर्वी काळे आणि त्यांची मुलगी सुभद्रा या हिंजवडी परिसरात राहण्यासाठी आले. त्यांनी भोंदूबाबालाही या ठिकाणी बोलावून घेतले. सुभद्रा ही नवऱ्यापासून वेगळी राहात असल्याने ती माण येथे भोंदूबाबा सोबत राहात होती. सुभद्राने त्याच्यासोबत राहण्यासाठी तीन लाख रुपये मागितले होते. त्या पैशांचा तगादा लावल्यामुळे भोंदूबाबाने चिडून ३ एप्रिल रोजी पहाटे सुभद्रा आणि तिची मुलगी झोपेत असताना हात-पाय बांधून त्यांच्या डोक्यात सळईने वार करून खून केला. त्यानंतर खोलीला बाहेरून कुलूप लावून तो पळून गेला होता. या प्रकरणी गुन्ह्य़ांचा तपास हिंजवडी पोलीस आणि गुन्हे शाखा करत होते.
गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पोलीस निरीक्षक सुनील पवार व त्यांच्या पथकाकडून भोंदूबाबाचा शोध सुरू होता. तो कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश येथील देवस्थानी राहून सतत ठिकाणे बदलत होता. भोपाळ येथील घुवा मंदिर येथे त्याला सहायक पोलीस निरीक्षक जालिंदर तांदळे यांनी शुक्रवारी ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता ऑक्टोबर १९९३ मध्ये नागपूर येथील सेंच्युरी लॉज येथे त्याची पत्नी पद्मा (वय ३०) आणि मुलगी शिरीषा (वय ४) यांचा साडीने गळा आवळून आणि बियरच्या बाटलीने वार करून पोट कापून खून केला होता. या प्रकरणी गणेश पेठ पोलीस ठाण्यात कनकाराजू शंकरआप्पा गंडमवार या नावाने दुहेरी खुनाचा गुन्हा दाखल आहे. या खुनामागील कारणांचा शोध सुरू आहे, असे भामरे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा