घरगुती गॅसवरील अनुदान आधार कार्डच्या आधारे ग्राहकांच्या बँकेत जमा करण्याची योजना पुणे जिल्ह्य़ात १ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. मात्र, आवश्यक बाबींची पूर्तता न करणाऱ्या नागरिकांसाठी ३१ जानेवारी २०१४ पर्यंतची वाढीव मुदत देण्यात आली असून, त्यानंतर सर्व नागरिकांना घरगुती गॅस सिलिंडर बाजारभावानुसारच खरेदी करावे लागणार आहेत.
जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांनी याबाबतची माहिती दिली. एलपीजीच्या सर्व ग्राहकांनी आधार कार्ड क्रमांक बँक खात्याशी व एसपीजी ग्राहक क्रमांकाशी तातडीने सलग्न करावेत, असे आवाहनही बोडके यांनी केले आहे. ग्राहकांना घरगुती गॅसवर दिले जाणारे अनुदान थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावर जमा करण्याची योजना १ नोव्हेंबरपासून पुणे जिल्ह्य़ात सुरू होणार आहे. त्यासाठी १ नोव्हेंबरपूर्वी ग्राहकांना त्यांच्या आधार कार्डचा क्रमांक बँक खात्याशी संलग्न करावा लागणार आहे. जे ग्राहक १ नोव्हेंबपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करू शकणार नाहीत. त्यांना ३१ जानेवारी २०१४ पर्यंतच सवलतीच्या दरात सिलिंडर दिले जातील. त्यानंतर मात्र सर्वच ग्राहकांना बाजारभावानुसार सिलिंडर खरेदी करावे लागतील. सर्व बाबींची पूर्तता केलेल्या नागरिकांनाच अनुदान मिळेल, असे बोडके यांनी स्पष्ट केले आहे.
ग्राहकांनी अर्ज भरून सध्याचे बँक खाते आधार कार्ड क्रमांकाशी जोडावे. हा अर्ज ग्राहकांनी बँकेत किंवा एलपीजी वितरकाच्या कार्यालयात जमा करावा. अधिक माहितीसाठी ग्राहकांनी गॅस एजन्सीशी संपर्क साधावा. हिंदुस्थान पेट्रोलियम (९८५०००४३८८), भारत पेट्रोलियम (९०११०२२०१० किंवा ९४२२५१३४००) या क्रमांकाशी संपक साधण्याचे आवाहन बोडके यांनी केले आहे.