स्वातंत्र्यानंतर ६० वर्षांनंतरही समाजात विशेषत: राजकीय जीवनात घडत असलेल्या अनेक गोष्टी अतिशय अस्वस्थ करणाऱ्या आहेत, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी भोसरीत बोलताना व्यक्त केली.
इंद्रायणी विद्यामंदिर संस्था-तळेगाव, अक्षर मानव प्रकाशन, खेड तालुक्यातील मलघेवाडी तसेच भोसरी ग्रामस्थ यांच्या वतीने डॉ. कोत्तापल्ले यांचा केंद्रीय नियोजन आयोगाचे सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते नागरी सत्काराचा कार्यक्रम होता. सत्कारानंतरच्या मनोगत त्यांनी ही अस्वस्थता मांडली. डॉ. संभाजी मलघे लिखित ‘नागनाथ कोत्तापल्ले सार्थक साहित्य प्रवास’ या ग्रंथाचे प्रकाशन ज्येष्ठ कवी वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी प्रा. मनोहर जाधव, इंद्रायणी संस्थेचे अध्यक्ष कृष्णराव भेगडे, आमदार विलास लांडे, नगरसेवक संजय वाबळे, अनुराधा गोफणे, सुनीता गवळी, शुभांगी लोंढे, आशा सुपे उपस्थित होते.
कोत्तापल्ले म्हणाले, अस्वस्थ व्हावे अशीच सध्याची परिस्थिती असून आजूबाजूचे राजकारण अस्वस्थ करणारे आहे. स्वातंत्र्यानंतरच्या दहा वर्षांत दलित, आदिवासींवर अतोनात अन्याय झाले. सरंजामशाहीची परंपरा असलेला भारतीय समाज बदलू पाहत होता. मध्ये काही वर्षे गेली. आता पुन्हा दिल्ल्लीपासून ते आजूबाजूला घडणाऱ्या घटना पूर्वीचेच चित्र उभ्या करतात. स्त्रियांना सन्मान मिळत नाही. त्यांना नीट वागवले जात नाही. या मागची कारणे शोधली पाहिजेत. अशा परिस्थितीत पुन्हा लिहावेसे वाटते. नरेंद्र जाधव म्हणाले, माणूस म्हणून कोत्तापल्ले यांचे मोठेपण आहे. इतरांना मदत करण्याची त्यांची प्रवृत्ती आहे. परखडपणा त्यांचे वैशिष्टय़ असून त्यांनी कधीही बोटचेपी भूमिका घेतली नाही. नि:स्पृह बाणा त्यांच्या अंगी आहे. ग्रामीण साहित्य चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. प्रास्तविक विलास लांडे यांनी केले. सूत्रसंचालन श्रीकांत चौगुले यांनी केले.
मराठी समीक्षा मागासलेली – वसंत डहाके
अलीकडे मराठी समीक्षा मागासलेली वाटते. वर्तमानकाळाकडे लक्ष दिले जात नाही व परखड विश्लेषण व्हावे, अशी भावनाही दिसून येत नाही, असे मत वसंत डहाके यांनी मांडले. वस्तुनिष्ठ विवेचन झाले पाहिजे, अभ्यासकाने भक्तीत वाहून जाता कामा नये. एकांगी पद्धतीने समीक्षा होत असतानाच्या काळात डॉ. संभाजी मलघे यांच्या या ग्रंथाचा अपवाद आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
स्वातंत्र्यानंतर ६० वर्षांनंतरही अनेक गोष्टी अस्वस्थ करणाऱ्या – डॉ. कोत्तापल्ले
इंद्रायणी विद्यामंदिर संस्था-तळेगाव, अक्षर मानव प्रकाशन, खेड तालुक्यातील मलघेवाडी तसेच भोसरी ग्रामस्थ यांच्या वतीने डॉ. कोत्तापल्ले यांचा केंद्रीय नियोजन आयोगाचे सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते नागरी सत्काराचा कार्यक्रम होता.
First published on: 13-05-2013 at 02:24 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After 60 years of independence many things making disturb dr kottapalle