पिंपरी-चिंचवड शहरात सध्या चोरांनी धुमाकूळ घातला आहे. पिंपरी गावठाण येथील महालक्ष्मी मंदिरातील तब्बल १५ ते २० तोळे सोन्यावर डल्ला मारला आहे. सामान्य जनता त्रासलेली असताना मदिरात झालेल्या चोरीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण करण्यात येत आहे. शुक्रवार पहाटे दीडच्या सुमारास पिंपरी गावातील महालक्ष्मी मंदीचराचा दरवाजाचे कुलूप तोडून चोरांनी देवीच्या मूर्तीवरील तब्बल १५ ते २० तोळे सोनं लंपास केल्याची घटना घडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून चोराने चेहरा न दिसण्यासाठी रुमालाचा वापर केला होता. विशेष म्हणजे या चोरीविषयी पिंपरी पोलीस तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ करत आल्याचे समोर आले.
गेल्या दहा दिवसांत पिंपरी-चिंचवड शहरात चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. पिंपळे गुरव, जुनी सांगवी, निगडी प्राधिकरण, पिंपरी गावठाण याठिकाणी चोरांनी हातसाफ केला आहे. १४ जुलैला पिंपळे गुरव तसेच जुनी सांगवी परिसरात रात्रीच्या वेळी तीन चोरट्यांनी चार एटीएम मशीनचा बनावट चावीने हूड उघडून तब्बल ७ लाख ८८ हजार रुपयांयांची चोरी केली. ही घटना देखील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. मात्र अद्याप ही सांगवी पोलिसांना आरोपीपर्यंत पोहचण्यास यश आलेले नाही. निगडी प्राधिकरण येथील इमारतीच्या पार्किंग मध्ये लावलेली टोयोटा इनव्हा (एम एच-१४.इ यु-२०४३) ही चारचाकी गाडी २५ जुलै रोजी रात्री दीडच्या सुमारास चोरांनी पळवली. गाडीची किंमत ही १० लाख रुपये आहे. यानंतर गाडीमालक उमंग सालगीया यांनी निगडी पोलिसात तक्रार दिली. गुरुवारी रात्रीही एक टाटासुमोची चोरी झाल्याची तक्रार निगडी पोलिसात दाखल करण्यात आली आहे. या सर्वच घटना गेल्या दहा ते पंधरा दिवसात घडल्या आहेत. पण पोलीस प्रशासन या घटना गांभीर्याने घेताना दिसत नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. मात्र या सर्वच चोरीच्या घटनेमधील चोर मोकाट आहेत. याविषयी परिमंडळ तीनचे उपायुक्त गणेश शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी चोरीचा उतरता आलेख असून घटनेमध्ये घट झाली आहे. यावेळी त्यांनी सध्या घडणाऱ्या घटनांवर मौन बाळगले.