पुणे : करोना संकटाच्या काळात डॉक्टरांकडून प्रतिजैविकांचा अतिवापर करण्यात आला. अनेक रुग्णांना आवश्यक नसतानाही प्रतिजैविके देण्यात आली. जगभरात सरासरी चारपैकी तीन रुग्णांना प्रतिजैविके देण्यात आली. यामुळे आता प्रतिजैविक प्रतिरोधाची समस्या जगभरात जाणवू लागली आहे, असा निष्कर्ष जागतिक आरोग्य संघटनेने काढला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जागतिक आरोग्य संघटनेने ६५ देशांतील रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या ४ लाख ५० हजार करोना रुग्णांच्या आरोग्य अहवालाची तपासणी केली. हे रुग्ण जानेवारी २०२० ते मार्च २०२३ या कालावधीतील आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, करोना संकटाच्या काळात रुग्णालयात दाखल झालेल्या केवळ ८ टक्के रुग्णांना प्रतिजैविके देण्याची गरज होती. प्रत्यक्षात डॉक्टरांकडून जगभरात सरासरी ७५ टक्के रुग्णांना प्रतिजैविके देण्यात आली. पश्चिम प्रशांत विभागात ३३ टक्के रुग्णांना तर आखाती आणि आफ्रिकी देशांमध्ये ८३ टक्के रुग्णांना प्रतिजैविके देण्यात आली. युरोप आणि अमेरिकेत २०२० ते २०२२ या कालावधीत प्रतिजैविके देण्यात प्रमाण हळूहळू कमी झाले. मात्र, आफ्रिकेत ते वाढताना दिसून आले.

आणखी वाचा-पुणे : महंमदवाडी येथे भंगार मालाच्या गोदामाला आग

प्रतिजैविकांचा सर्वाधिक वापर करोनामुळे गंभीर स्थिती झालेल्या रुग्णांमध्ये झाला. जगभरात अशा ८१ टक्के रुग्णांना प्रतिजैविके देण्यात आली. मध्यम अथवा सौम्य त्रास असलेल्या करोना रुग्णांना प्रतिजैविके देण्याचे प्रमाण विभागनिहाय वेगळे असून, त्यात आफ्रिकेत सर्वाधिक ७९ टक्के रुग्णांना प्रतिजैविके देण्यात आली. विशेष म्हणजे, प्रतिजैविके देण्यात आल्याने करोना रुग्णांच्या प्रकृतीत फरक पडला नाही. याउलट जीवाणूसंसर्ग नसलेल्या रुग्णांच्या आरोग्याला त्यामुळे अपाय झाला, असे संघटनेने नमूद केले आहे.

एखाद्या रुग्णाला प्रतिजैविके देण्याची गरज असते त्यावेळी जोखमीपेक्षा फायदा अधिक असल्याचे तपासले जाते. मात्र, गरज नसताना रुग्णाला प्रतिजैविक दिल्यास कोणताही फायदा होत नाही. उलट रुग्णामध्ये प्रतिजैविक प्रतिरोध निर्माण होतो. -डॉ. सिल्व्हिया बर्टानोलियो, प्रतिजैविक प्रतिरोध विभाग, जागतिक आरोग्य संघटना

आणखी वाचा-पंतप्रधानांच्या सभास्थळाला छावणीचे स्वरूप… पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त…

जागतिक आरोग्य संघटना काय म्हणते…

  • करोना संकटाच्या काळात गरज नसताना रुग्णांना प्रतिजैविके
  • जगभरात चारपैकी तीन रुग्णांना प्रतिजैविके
  • प्रतिजैविके देऊनही करोना रुग्णांना फायदा नाही
  • जीवाणूसंसर्ग नसलेल्या रुग्णांना प्रतिजैविकांमुळे अपाय
  • अनेक रुग्णांमध्ये प्रतिजैविक प्रतिरोधाची समस्या निर्माण

प्रतिजैविक प्रतिरोध म्हणजे काय?

एखाद्या व्यक्तीला जीवाणू आणि बुरशी संसर्ग झाल्यानंतर त्यावरील उपचार म्हणून प्रतिजैविक औषधे दिली जातात. प्रतिजैविकांचा अतिवापर झाल्यास त्या व्यक्तीच्या शरीरात त्यासाठी प्रतिरोध निर्माण होतो. त्यामुळे जीवाणू आणि बुरशी प्रतिजैविकांना दाद देत नाहीत. यामुळे एखाद्या व्यक्तीला संसर्ग झाल्यानंतर त्याच्यावर उपचार करणे अवघड बनते. त्यातून संसर्ग झालेली व्यक्ती गंभीर आजारी पडण्यासोबत तिचा मृत्यूही होऊ शकतो.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After corona crisis new danger has increased world health organization warning pune print news stj 05 mrj