लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आषाढीवारीसाठी प्रस्थान झाल्यानंतर पुन्हा तीर्थक्षेत्र देहू, आळंदीतून वाहणाऱ्या लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणीतील पाण्यावर तवंग (फेस) आला आहे. सांडपाणी नदीत मिसळणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी आणि नदी प्रदूषित करणा-यांवर लक्ष ठेवण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तीन दक्षता पथके नेमली असली, तरी या पथकांनाही तवंग पुन्हा कसा आला, याचा थांगपत्ता लागला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

आषाढीवारीच्या तोंडावर इंद्रायणी नदीतील पाण्यावर मोठ्या प्रमाणात तवंग येत होता. अवघ्या नदी पात्रात तवंग दिसत होते. वारक-यांनी नाराजी व्यक्त केल्यावर प्रशासनाने आंद्रा आणि वडिवळे धरणातून पाणी सोडून नदीचे पात्र स्वच्छ केले. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंद्रायणी प्रदूषण मुक्त करण्याचे आश्वासन दिले. मात्र, पालख्यांचे प्रस्थान झाल्यानंतर पाण्यावर तवंग येण्यास सुरुवात झाली.

आणखी वाचा-पिंपरी- चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातील मिळकती होणार ‘फ्री होल्ड’; ५ लाख नागरिकांना मिळणार दिलासा

इंद्रायणी नदीचा उगम हा लोणावळा परिसरातून झाला. ही नदी अनेक गावे, शहरे पार करत देहू, आळंदीतून पुढे वाहत जाते. इंद्रायणी नदीचे १९ किलोमीटर पात्र पिंपरी-चिंचवड शहरातून वाहते. शहरातील औद्योगिक वसाहती, इंद्रायणी नदीकाठच्या कारखान्यातील रसायनयुक्त पाणी, गावांमधील मैलायुक्त पाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी नदी पात्रात सोडले जाते. घनकचरा, प्लॅस्टिक कचरा, राडारोडाही टाकला जातो. यामुळे नदी प्रदूषण वाढत असून जलसृष्टी धोक्यात आली आहे. नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

‘एमपीसीबी’ कडून नोटिसांचा खेळ

नदी प्रदूषणाला जबाबदार धरत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) नगरपरिषद, ग्रामपंचायतींना नोटीसा दिल्या. या शासकीय कार्यालयांनी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) अद्ययावत केले नसल्याने आणि त्यातून दूषित पाणी नदीत सोडल्याने इंद्रायणी प्रदूषित होत असल्याचा ठपका ठेवला. आता पुन्हा पिंपरी-चिंचवड महापालिका, तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि वडगाव नगरपंचायतीला नोटीस बजाविली आहे. मंडळाकडून केवळ नोटिसांचा खेळ केला जातो. ठोस कोणतीही कारवाई केल्याचे दिसत नाही.

आणखी वाचा-स्कुल बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले, दैव बलवत्तर म्हणून अनर्थ टळला; बचावले ५० हून अधिक जीव! वाचा नेमकं काय घडलं!

पथकाला काय आढळले?

सांडपाणी नदीत मिसळणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी आणि नदी प्रदूषित करणा-यांवर लक्ष ठेवण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सहा लोकांच्या तीन चमू (टीम) नेमल्या आहेत. पाण्यावर पुन्हा तवंग कसा आल, याचा शोध या पथकांना घेता आलेला नाही. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी रवींद्र आंधळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

महाविकास आघाडीचे आंदोलन

सत्ताधा-यांच्या दुर्लक्षामुळेच नदीची अशी अवस्था झाल्याचा आरोप करत आळंदी येथे महाविकास आघाडीच्या वतीने टाळ मृदंगाच्या गजरात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात वारकरी आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.

आणखी वाचा-माउलींच्या पालखी सोहळ्यात सिलेंडरने घेतला पेट;अग्निशमन दलाच्या जवानांकडून वेळीच आग आटोक्यात

औद्योगिक क्षेत्रातील रसायनयुक्त पाणी आणि कचरा थेट नदीपात्रात टाकला जातो. याकडे महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष आहे. भाजपने नदी स्वच्छतेच्या नावाखाली स्वत:चे खिसे भरले आहेत. भाजपचा नाकर्तेपणा, भ्रष्टाचारामुळे नदीची अशी अवस्था झाली आहे. -सुलभा उबाळे, संघटिका, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष