आता कात्रजच्या धर्तीवर शहराच्या वीस प्रभागांमध्ये ‘झीरो गार्बेज वॉर्ड मॉडेल’ राबवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात वीसपैकी अकरा प्रभागांत हे मॉडेल राबवण्यात येणार असून त्याच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेने जनवाणी या संस्थेबरोबर करार केला आहे. जनवाणीबरोबर ‘स्वच्छ’ ही संस्था आणि इतर काही स्थानिक संस्थाही उपक्रमाला हातभार लावणार आहेत.
महापालिकेच्या घनकचरा विभागाचे प्रमुख व सहआयुक्त सुरेश जगताप, जनवाणीचे संचालक डॉ. किरण कुलकर्णी, ‘कायनेटिक इंजिनियरिंग’चे अध्यक्ष अरुण फिरोदिया आणि ‘केपीआयटी कमिन्स’चे अध्यक्ष रवी पंडित आदींनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
जनवाणीच्या http://www.janwani.org या संकेतस्थळावर वॉर्डातील कचरा उचलणाऱ्या घंटागाडय़ांचे मार्ग नकाशाद्वारे दाखवले आहेत. प्रत्येक वॉर्डात संस्थेतर्फे एक स्वच्छता मित्र नेमून घंटागाडी ठरलेल्या वेळी आली का, वॉर्डातून एकूण किती कचरा गोळा झाला, यांतील ओला आणि सुका असे विभाजन किती कचऱ्याचे केले होते, या गोष्टींची पाहणी करण्यात येणार आहे. हे तपशीलही संकेतस्थळावर अपलोड करण्यात येणार आहेत. वॉर्डामध्ये जास्तीत जास्त कचऱ्याचे विभाजन केले जावे आणि वॉर्ड कंटेनरमुक्त करता यावा असे या उपक्रमाचे उद्दिष्ट असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले. कात्रज वॉर्डमध्ये हा उपक्रम यशस्वी रीत्या राबवण्यात आला असून गेल्या दोन वर्षांत कात्रजमधील गरीब वस्त्यांमध्ये रोगराईचा प्रादुर्भाव कमी होऊन कचरा विभाजनामुळे कचरा उचलणाऱ्यांना मिळणाऱ्या मोबदल्यात वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. स्वच्छतेमुळे येथील मालमत्तांचे भावही वाढले आसल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले.
‘सीएसआर’साठी संस्थांचा शोध झाला सोपा
कॉर्पोरेट कंपन्यांना त्यांच्या ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ (सीएसआर) प्रकल्पांसाठी सामाजिक संस्थांची मदत घेणे सोपे जावे यासाठी जनवाणीच्या संकेतस्थळावर ‘जनवाणी सहयोग’ या नावाने एक विशेष पान सुरू करण्यात आले आहे. सामाजिक संस्था या पानावर जाऊन आपल्या माहितीची नोंदणी करू शकणार आहेत. तसेच संस्थांना तेथे आपल्या स्वत:च्या संकेतस्थळाची ‘लिंक’ही देता येणार आहे.

Story img Loader