पुणे : ससून रुग्णालयात सध्या केवळ एक कैदी रुग्ण उरला आहे. अमली पदार्थ तस्करीचा सूत्रधार ललिल पाटील याने रुग्णालयातून पलायन केल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने सावधगिरी बाळगण्यास सुरुवात केली आहे. कैदी रुग्णांना तातडीने येरवडा कारागृहात पाठविण्यात येत आहे. विशेष म्हणजे या महिन्यात केवळ दोन कैदी रुग्ण रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांनाही उपचार करून पुन्हा कारागृहात पाठविण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ललित पाटीलने पलायन केले, त्या वेळी ससून रुग्णालयात १६ कैदी उपचार घेत होते. पाटीलने पलायन केल्यानंतर मोठा गदारोळ झाला. त्यानंतर कैदी रुग्ण समितीने तातडीने बैठक घेतली. या बैठकीत सर्व कैदी रुग्णांच्या उपचारांचा आढावा घेण्यात आला. त्यात माजी आमदार अनिल भोसले यांच्यासह १२ कैद्यांना लगेचच कारागृहात पुन्हा पाठविण्यात आले. आता ससूनमधील कैदी रुग्ण कक्ष क्रमांक १६ मध्ये केवळ एका रुग्णावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा – मराठा आरक्षणावरून आंदोलनकर्ते आक्रमक; पिंपरीत सरकारचा घातला दशक्रिया विधी…आंदोलनकर्त्यांनी केले मुंडन…

ससूनमध्ये महिन्याला सरासरी १५ कैदी रुग्ण येरवडा कारागृहातून उपचारासाठी दाखल होतात. या महिन्यात केवळ दोन कैदी रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. त्यातील एक कैदी ११ ऑक्टोबरला दाखल झाला. त्याची मानसिक तपासणी करावयाची होती. त्याला २५ ऑक्टोबरला पुन्हा पाठविण्यात आले. याचबरोबर एक महिला कैदी २१ ऑक्टोबरला दाखल झाली. तिचा गर्भपात करावयाचा होता. तो झाल्यानंतर तिला २६ ऑक्टोबरला कारागृहात पाठविण्यात आले. त्यामुळे येरवडा कारागृहातून सूसनमध्ये कैदी पाठविण्याचे प्रमाण कमी झाल्याचे समोर आले आहे. त्याच वेळी कैदी दाखल करून घेण्याचे प्रमाणही ससून प्रशासनाने कमी केले आहे.

अधिष्ठात्यांना ललितवर करायची होती शस्त्रक्रिया

ललित पाटीलवर खुद्द अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्याकडून उपचार सुरू होते. त्याच्यावर आधी क्षयरोग आणि नंतर हर्नियाचे उपचार सुरू होते. नंतर ठाकूर यांनी ललितची लठ्ठपणाची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. याबाबतचे पत्र त्यांनी वैद्यकीय अधीक्षकांना पाठवले होते. हे पत्र आता समोर आल्याने अधिष्ठात्यांनीच ललितचा रुग्णालयातील मुक्काम वाढविल्याचा आरोप केला जात आहे.

हेही वाचा – रेल्वे प्रवाशांवर आता ताबडतोब उपचार! पुणे स्थानकावर आपत्कालीन वैद्यकीय कक्षाची २४ तास सुविधा

ससूनमधील कैदी रुग्णांवरील उपचार

  • दरमहा १५ कैदी दाखल होत असताना या महिन्यात केवळ २ दाखल
  • कैदी रुग्ण कक्ष क्रमांक १६ मध्ये सध्या केवळ एकच रुग्ण
  • येरवडा कारागृहातून ससूनला पाठवल्या जाणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी
  • ससून प्रशासनाकडून कैदी रुग्ण दाखल करून घेण्याचेही प्रमाण कमी
  • कैदी रुग्ण कक्षात जाणाऱ्या डॉक्टर, कर्मचाऱ्यांची प्रत्येकी वेळी नोंद
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After lalit patils escape only one inmate patient remained in sassoon pune print news stj 05 ssb
Show comments