पुणे : मुसळधार पावसामुळे जाहिरात फलक (होर्डिंग) बँड पथकाच्या वाहनावर कोसळल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर परिसरात शनिवारी सायंकाळी घडली. होर्डिंग पडल्याने बँड पथकातील घोडा जखमी झाला. सुदैवाने या घटनेत कोणी गंभीर जखमी झाले नाही.
मुंबईतील घाटकोपर परिसरात होर्डिंग कोसळून १६ जणांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेनंतर बेकायदा जाहीरात फलकांचा प्रश्न ऐरणीवर आला. बेकायदा जाहिरात फलक काढून टाकण्याचे आदेश पुणे, मुंबई, ठाणे महानगरपालिकेने दिले. सोलापूर रस्त्यावर शनिवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे लोणी काळभोर परिसरात जाहिरात फलक कोसळला. त्यावेळी तेथून निघाालेल्या बँड पथकाच्या वाहनावर कोसळला. बँड पथकातील घोडा जखमी झाला. या घटनेचे माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने या घटनेत कोणी गंभीर जखमी झाले नाही, अशी माहिती लोणी काळभोर पोलिसांनी दिली.