लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीमधील घटक पक्ष भाजपचा आमदार असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघावर दावा केल्यानंतर आता भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी राष्ट्रवादीचा आमदार असलेल्या पिंपरी मतदारसंघावर दावा केला आहे. त्यामुळे शहरातील तीन विधानसभा मतदार संघापैकी चिंचवड आणि पिंपरीवरून महायुतीतमध्ये कलगीतुरा रंगल्याचे दिसून येत आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा शुक्रवारी (१६ ऑगस्ट) पिंपरी-चिंचवड शहरात येणार आहे. त्याचदिवशी भाजपच्या मंडल अध्यक्षांची चिंचवड येथे दिवसभर बैठक आयोजित केली आहे. शहरातील पिंपरी विधानसभा मतदार संघात अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे, चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप आणि भोसरीत भाजपचेच महेश लांडगे आमदार आहेत. महायुतीत ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाला संबंधित विधानसभा मतदार संघ सोडण्याचे प्राथमिक सूत्र ठरल्याचे सांगितले जाते. मात्र, पिंपरी-चिंचवडमध्ये मित्र पक्षाचा आमदार असलेल्या मतदारसंघावर दावे केले जात आहेत.

आणखी वाचा-शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनसाठी आणखी एक समिती

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांनी पिंपरीसह चिंचवड विधानसभा मतदार राष्ट्रवादीला मिळावा, अशी अपेक्षा १३ ऑगस्ट रोजी व्यक्त केली होती. त्यामुळे चिंचवड मतदार संघातील भाजपच्या इच्छुकांमध्ये अस्वस्थता पसरली. भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी तत्काळ दुसऱ्यादिवशी १४ ऑगस्ट रोजी प्रत्युत्तर दिले. पिंपरी विधानसभा मतदार संघातून लोकसभेला महायुतीच्या उमेदवाराला १६ हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. त्यात भाजप कार्यकर्त्यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे आम्हाला हा मतदार संघ मिळावा, अशी अपेक्षा आहे. मात्र, महायुतीमध्ये जागा वाटपांचे जे काही सूत्र ठरेल, त्यानुसार आम्ही काम करू, असेही जगताप म्हणाले.

आणखी वाचा-स्टेट बँकेचे लाखो कोटींच्या कर्जावर पाणी! बड्या थकबाकीदारांकडून केवळ १२ टक्के वसुली

भाजपमध्ये ताळमेळ नसल्याची कबुली

भोसरी विधानसभा मतदार संघातील भाजपच्या विविध कार्यक्रमांच्या जाहिरात फलकांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार महेश लांडगे यांचेच छायाचित्र असते. शहराध्यक्ष शंकर जगताप यांचे छायाचित्र नसते. आमदार लांडगे हे राजशिष्टाचार पाळत नसून त्यांच्यावर पक्षांतर्गत शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. काळभोर यांच्या पत्राबाबत आपणास काहीही माहिती नसल्याचे शहराध्यक्ष जगताप यांनी सांगितले. तुमच्यामध्ये ताळमेळ नाही का, असे विचारल्यानंतर हो आमच्यात ताळमेळ नसेल, असे ते म्हणाले.